लंडन : भारताने बहिष्काराचा इशारा दिल्यानंतरही नेमबाजीला २०२२च्या बर्मिगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वगळण्याच्या भूमिकेबाबत राष्ट्रकुल क्रीडा महासंघ ठाम आहे. १९७४ नंतर प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्याचा निर्णय घेतला आहे. नेमबाजी हा राष्ट्रकुलमधील अनिवार्य क्रीडा प्रकार नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष लुसी मार्टिन यांनी दिले आहे.

‘‘नेमबाजीबाबत आम्ही पुनर्विचार केला. परंतु त्याच्या समावेशाची आता सुतराम शक्यता नाही,’’ असे मार्टिन यांनी सांगितले. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने नेमबाजीला वगळल्यानंतर भारताने आगामी राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्काराचा इशारा दिला होता. यासंदर्भात भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेतली होती.

बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीच्या दोन प्रकारांच्या समावेशाची तयारी राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने दर्शवली होती. परंतु सर्व प्रकारांचा समावेश करण्यात यावा, अशी भूमिका घेत आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाने हा प्रस्ताव फेटाळला.

बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश

मेलबर्न : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १९९८नंतर प्रथमच क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. २०२२मध्ये बर्मिगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचा समावेश असेल, अशी घोषणा राष्ट्रकुल क्रीडा महासंघ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी केली.राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश फक्त एकदाच करण्यात आला होता. १९९८च्या क्वालालम्पूर राष्ट्रकुलमधील क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने सुवर्णपदक प्राप्त केले होते. बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा २७ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. यातील क्रिकेट स्पर्धेत आठ संघांचा समावेश असेल, तर सर्व सामने एजबॅस्टन स्टेडियमवर होतील. ‘‘आज ऐतिहासिक दिवस आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील क्रीडाप्रकारांमध्ये क्रिकेटच्या समावेशाचे आम्ही स्वागत करतो,’’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष डॅमे लॉसी मार्टिन यांनी व्यक्त केली.