ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या आगामी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघासमोर सलामीच्या सामन्यातच पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी परिषदेने २०१८ राष्ट्रकुल स्पर्धांमधील हॉकीच्या सामन्यांचं वेळापत्रक नुकतच जाहीर केलं आहे. आशिया चषक विजेत्या भारतीय संघाला ‘ब’ गटात तुलनेने सोप्या प्रतिस्पर्ध्यांच्या गटात स्थान देण्यात आलेलं आहे. या गटात भारतासमोबत पाकिस्तान, इंग्लंड, मलेशिया आणि वेल्स या देशांचा सहभाग असणार आहे. याव्यतिरीक्त गतविजेते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि स्कॉटलंड या देशांचा ‘अ’ गटात समावेश करण्यात आलेला आहे.

७ एप्रिल रोजी भारतीय हॉकी संघ पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळेल. यानंतर वेल्स (८ एप्रिल), मलेशिया (१० एप्रिल), इंग्लंड (११ एप्रिल) यांच्याविरुद्ध भारतीय संघाचे सामने रंगणार आहेत. भारतीय महिला हॉकी संघाला ‘अ’ गटात स्थान मिळालं असून या गटात मलेशियाला इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, मलेशिया आणि वेल्स या देशांचा सामना करायचा आहे. याव्यतिरीक्त ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, स्कॉटलंड, कॅनडा आणि घाना या देशांचे महिलांचे संघ ‘ब’ गटात सामने खेळणार आहेत.

पुरुष आणि महिलांच्या स्पर्धेत दोनही गटातले सर्वोत्तम दोन संघ उपांत्य फेरीसाठी दाखल होतील. महिलांचा उपांत्य फेरीचा सामना हा १२ एप्रिल रोजी रंगणार आहे, तर पुरुषांचे सामने हे १३ एप्रिल रोजी रंगणार आहेत. पुरुष आणि स्त्रियांसाठी कांस्य आणि सुवर्णपदकासाठीचे सामने हे १४ एप्रिलरोजी पार पडणार आहेत. ११ वी राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ साली ५ ते १४ एप्रिल या कालावधीत ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट भागात संप्पन होणार आहे.