‘‘आशियाई कनिष्ठ गट कुस्ती स्पर्धेतील रौप्यपदकामुळे माझा आत्मविश्वास उंचवला असून आता माझे लक्ष्य राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये सोनेरी यश मिळविण्याचे आहे,’’ असे वरवंड (दौंड) येथील महिला कुस्तीगीर मनीषा दिवेकर हिने सांगितले. थायलंडमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने ७२ किलो गटात रौप्यपदक मिळविले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिची ही पहिलीच स्पर्धा होती. ती आळंदी येथील जोग महाराज व्यायामशाळेत प्रा. दिनेश गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. मनीषाचे वडील महादेव हे शेतकरी असून ते स्वत: पहिलवान होते. मनीषाचा भाऊ राहुल हादेखील राज्य स्तरावर कुस्ती खेळला आहे.
‘‘वडिलांकडूनच या खेळाचे बाळकडू लाभले. त्यांनी मला या खेळाकरिता सतत प्रोत्साहन व आर्थिक पाठबळ दिले आहे. ऑलिम्पिकमध्ये कुस्ती हा खेळ निश्चित राहील व या खेळात पदक मिळविण्याचा मी प्रयत्न करणार आहे,’’ असे मनीषाने सांगितले. ती दररोज सकाळी तीन तास व सायंकाळी तीन तास सराव करीत आहे. आजपर्यंत तिने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये आठ सुवर्णपदके जिंकली आहेत.