कटक : भारतीय पुरुष आणि महिला संघांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर मात करत २१व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

भारतीय महिलांनी वेल्स, मलेशिया आणि नायजेरिया यांचा ३-० अशा फरकाने पराभव करत अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवले.

पुरुष संघाने श्रीलंका आणि मलेशियाचा ३-० असा धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली. श्रीलंकेविरुद्ध अँथनी अमलराजने कृष्णन विक्रमारथ याचा पराभव केला. जी. साथियन आणि मानव ठक्कर यांनी अनुक्रमे निर्मला जयासिंघे आणि मिलिंदा लक्षिथा यांना पराभूत करत विजय मिळवून दिला. मलेशियाविरुद्ध भारताने अमलराजसह अचंता शरथ कमाल, हरमीत देसाई यांना संधी दिली. या तिघांनीही अनुक्रमे फेंग ची लेआँग, मुहम्मद रिझाल आणि की शेन वाँग यांच्यावर सरशी साधली.

महिलांमध्ये, वेल्सवरील विजयात मधुरिका पाटकर, अर्चना कामत आणि अयहिका मुखर्जी यांनी योगदान दिले. भारताने अर्चना कामत, मनिका बात्रा आणि मधुरिका पाटकर यांच्या अप्रतिम खेळामुळे मलेशियाचा धुव्वा उडवला. त्यानंतर नायजेरियावर मात करण्यात मनिका, अर्चना आणि सुतिर्था मुखर्जी यांनी मोलाचा वाटा उचलला.