भारताचा वेटलिफ्टर प्रदीप सिंग याने Commonwealth Weightlifting Championship स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सुवर्णकमाई केली. प्रदीपने क्लीन अँड जर्क प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धांमधील विक्रम मोडीत काढला आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. प्रदीपने शनिवारी १०९ किलो वजनी गटात क्लीन अँड जर्क प्रकारात २०२ किलो वजन उचलून नवीन विक्रम प्रस्थापित केला. त्याआधी त्याने पहिल्या प्रयत्नात १४८ किलोचे वजन उचलले होते. त्यामुळे त्याने एकूण ३५० किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला आणि सुवर्णकमाई केली.

याशिवाय, २ वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत पदक विजेता ठरलेला विकास ठाकूर याने पुरुषांच्या ९६ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. विकासने दोन प्रयत्नात १५३ किलो आणि १८५ किलो असे मिळून एकूण ३३८ किलो वजन उचलून रौप्यपदकाला गवसणी घातली.

याआधी Commonwealth Weightlifting Championship स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने जागतिक पातळीवर दमदार कामगिरी केली. Commonwealth Weightlifting Championship स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी (गुरुवारी) त्याने एका प्रयत्नात तब्बल ३ विक्रम मोडीत काढले. १६ वर्षाच्या जेरेमीने दिमाखदार कामगिरी करताना ६७ किलो वजन गटात स्नॅचमध्ये १३६ किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला. त्याच्या या उचलीमुळे त्याने थेट युवा विश्वविक्रम, आशियाई स्पर्धांमधील विक्रम आणि राष्ट्रकुल स्पर्धांमधील विक्रम असे ३ विक्रम मोडून टाकले. या आधीचा युवा विश्वविक्रम आणि आशियाई विक्रम हा देखील जेरेमीच्याच नावावर होता. त्याने एप्रिल महिन्यात चीनच्या निग्बो येथे १३४ किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला होता.

दरम्यान, या स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सने उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ३५ पदकांची कमाई केली. यासह भारतीय खेळाडूंनी युवा, कनिष्ठ आणि वरिष्ठ गटात अनेक जुने विक्रम मोडले आणि नवे विक्रम प्रस्थापित केले.