टोक्यो ऑलिम्पिकसाठी माझा सराव उत्तम सुरू आहे. पण गेली दोन वर्षे दुखापती आणि करोनामुळे वाया गेल्यामुळे ऑलिम्पिकआधी मला स्पर्धांची नितांत आवश्यकता आहे, असे मत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा याने व्यक्त केले आहे.

२३ वर्षीय नीरजकडून ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा बाळगण्यात येत आहे. ‘‘स्पर्धांचा अनुभव मिळावा, यासाठी मी भारतीय क्रीडा प्राधिकरणाशी (साइ) चर्चा करत आहे. सरावात मी १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. सरावावर लक्ष केंद्रित करणे चांगले असून तो योग्य पद्धतीने सुरूही आहे. पण मला स्पर्धांची आवश्यकता आहे. ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ (टॉप्स) आणि ‘साइ’ यांनीही त्यांच्यापरीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दुखापतीमुळे मला २०१९मध्ये एकाही स्पर्धेत सहभागी होता आले नाही. गेल्या वर्षीपासून करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने सलग दोन वर्षे वाया गेली आहेत. त्यामुळे मला स्पर्धेचा अनुभव हवा आहे,’’ असेही नीरजने सांगितले.

‘टॉप्स’ आणि ‘साइ’तर्फे आयोजित या संवादात नीरजने स्पर्धांचे महत्त्व समजावून सांगितले. तो म्हणाला, ‘‘प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करायची असेल तर एकट्याने सराव करून काहीही उपयोग नाही. स्पर्धांमध्ये खेळलोच नाही तर सरावाचा काहीही फायदा नाही. आम्ही गेल्या वर्षीपासून सराव करत आहोत, पण एकाही स्पर्धेत अद्याप खेळलो नाही. ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा विचार करण्यासाठी तितक्याच ताकदवान प्रतिस्पध्र्यांसमोर मैदानात उतरायला हवे. पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळत असल्याने माझा अनुभव तोकडाच आहे.’’