करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेलेला नाही. मात्र यामुळे होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयसीसीने क्रिकेटचा सराव सुरु करण्यासाठी काही दिवसांपूर्वी नियम आखून दिले होते. यानंतर लॉकडाउन पश्चात क्रिकेटचे सामने सुरु करण्यासाठीही आयसीसीने काही नियमांमध्ये बदल केला आहे. ज्यात गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करता येणार नाहीये. प्रादूर्भाव टाळण्यासाठी आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जरी तात्पुरता असला तरीही काही गोलंदाज यामुळे खुश नाहीयेत. इशांत शर्मानेही या नियमावर काहीशी नाराजी व्यक्त केली आहे.

“जर आम्ही लाल चेंडूला चकाकी आणली नाही तर तो स्विंग होणार नाही. चेंडू जर स्विंग होणार नसेल तर फलंदाजांसाठी ते एकद सोपं होईल. माझ्यामते स्पर्धा ही बरोबरीची व्हायला हवी, फलंदाजांचा धार्जिणा खेळ खेळण्यात अर्थ नाही. चेंडू ज्यावेळी नवा असतो त्यावेळी शक्यतो गोलंदाज लाळ किंवा थुंकीचा वापर करतो. तो जुना झाला की मग घामाचा वापर होतो. त्यामुळे लॉकडाउन नंतर क्रिकेट सुरु होईल त्यावेळी लाळेचा वापर न करणं ही सर्वांसाठी मोठी परीक्षा असणार आहे. प्रत्येक गोलंदाजाला यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल.” इशांत Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलत होता.

३१ वर्षीय इशांत शर्मा गेल्या काही वर्षांपासून भारतीय कसोटी संघाचं प्रतिनिधीत्व करतो आहे. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये २९७ आणि वन-डे क्रिकेटमध्ये ११५ बळी नावावर असलेला इशांत शर्मा टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज मानला जातो. वन-डे क्रिकेटमध्ये इशांतला आपलं स्थान कायम राखता आलेलं नसलं तरीही कसोटी क्रिकेटसाठी तो भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू मानला जातो.