वन-डे मालिकेत न्यूझीलंडला 4-1 ने धुव्वा उडवल्यानंतर टी-20 मालिकेच्या सुरुवातीच्याच सामन्यात भारताच्या पदरात मोठा पराभव पडला. भारतावर 80 धावांनी मात करत न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 220 धावांचं आव्हान उभं केलं. यावेळी पॉवरप्ले आणि मधल्या षटकांमध्ये जास्त धावा देणं आम्हाला महागात पडल्याचं अष्टपैलू कृणाल पांड्याने कबूल केलं.

“220 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणं सोपं नसतं. गोलंदाजीदरम्यान पॉवरप्ले आणि मधल्या काही षटकांमध्ये आम्ही खूप धावा दिल्या, त्याचाच आम्हाला फटका बसला. याचसोबत न्यूझीलंडच्या फलंदाजांनीही काल चांगला खेळ केला, त्यामुळे त्यांचा संघ विजयासाठी पात्र ठरत होता.” सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कृणाल पांड्या बोलत होता.

वेलिंग्टनच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी पुरती निराशा केली. महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक यांनी मोक्याच्या क्षणी महत्वाच्या खेळाडूंचे झेल टाकले, ज्याचा पुरेपूर फायदा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी घेतला. त्यामुळे आगामी सामन्यात या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं असल्याचंही पांड्या म्हणाला. या मालिकेतला दुसरा सामना शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – भारत दौऱ्याआधी कांगारुंना मोठा धक्का, मिचेल स्टार्क दुखापतीमुळे बाहेर