स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने आजन्म बंदी ठोठावलेला भारतीय क्रिकेटपटू श्रीसंत याने पोलिसांच्या भीतीने आपण गुन्हा कबूल केल्याचा दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयात श्रीसंतने दिल्ली पोलिसांनी आपल्या कुटुंबाला गोवण्याची तसंच छळ करण्याची धमकी दिल्यानेच आपण स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा गुन्हा कबूल केला असल्याचं सांगितलं.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये आयपीएलदरम्यान स्पॉट फिक्सिंगसाठी आपल्याशी संपर्क साधण्यात आल्याचं बीसीसीआयला तात्काळ कळवण्यात का आलं नाही असा सवाल श्रीसंतला विचारला. सर्वोच्च न्यायालयाने स्पॉट फिक्सिंगच्या काळाता श्रीसंतची वर्तवणूक योग्य नव्हती असा ठपका ठेवला.

आपल्यावर बीसीसीआयकडून लावण्यात आलेली बंदी अत्यंत कठोर असून आपण बेकायदेशीर गोष्टींमध्ये सहभागी होतो हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नव्हता असंही श्रीसंतकडून न्यायाधीश अशोक भूषण आणि के एम जोसेफ यांच्या खंडपीठासमोर सांगण्यात आलं.

यावेळी श्रीसंतचे वकील सलमान खुर्शीद यांनी न्यायालयात सांगितलं की, ‘पोलिसांनी श्रीसंत आणि त्याच्या कुटुंबाला गुन्हा कबूल केला नाही तर छळ केला जाईल अशी धमकी दिली होती’. सलमान खुर्शीद यांनी मे २०१३ रोजी राजस्थान आणि पंजाबदरम्यान मोहालीत झालेल्या आयपीएल सामन्यात स्पॉट फिक्सिंग झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं न्यायालयात सांगितलं. यासोबतच असं करण्यासाठी पैसे मिळाल्याचाही कोणता पुरावा नसल्याचं ते म्हणाले.

बुकी आणि श्रीसंतमध्ये फोनवर चर्चा झाल्यानंतर लगेचच हे बीसीसीआयच्या निदर्शनास आणून का देण्यात आलं नाही असा सवाल यावेळी न्यायालयाने विचारला.

बीसीसीआयने लावलेल्या आजन्म बंदीच्या शिक्षेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज श्रीसंतने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं असून ही शिक्षा खूपच कठोर आहे, आपल्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली पाहिजे अशी मागणी केली आहे. 2013 च्या आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर श्रीसंतवर क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.