भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरचा विश्वास

मुंबई : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आम्ही दडपणाची परिस्थिती कशा प्रकारे हाताळतो, यावरच बहुतांश यश अवलंबून आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केली.

ऑस्ट्रेलियात २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी गुरुवारी भारताचा संघ रवाना झाला. विश्वचषकापूर्वी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिरंगी स्पर्धासुद्धा रंगणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर हरमनप्रीत कौर आणि प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रामन यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संघाच्या व्यूहरचनेबाबत मत मांडले.

‘‘गेल्या दोन विश्वचषकांमध्ये आम्ही विजेतेपदाच्या फार जवळ होतो; परंतु दडपणाच्या परिस्थितीत आमची कामगिरी ढासळली. किंबहुना आम्हीच स्वत:वर दडपण ओढवून घेतले. त्यामुळे यंदाही आम्ही कशा प्रकारे दडपण हाताळतो, हे निर्णायक ठरेल,’’ असे ३० वर्षीय हरमनप्रीतने सांगितले. २०१७च्या विश्वचषकात भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर २०१८च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारत उपांत्य फेरीत पराभूत झाला. दोन्ही वेळेस इंग्लंडनेच भारताचे स्वप्न उद्ध्वस्त केले.

‘‘या वेळी आम्ही युवा खेळाडूंवर अधिक विश्वास दर्शवला असून स्वत:वर अतिरिक्त दडपण घेण्याऐवजी आक्रमक खेळ करण्यावर आमचा भर राहील. त्यामुळे सुरुवातीपासूनच आम्ही कुठपर्यंत मजल मारू, याचा विचार न करता एकेका सामन्यानुसार आम्ही रणनीती आखणार आहोत,’’ असेही हरमनप्रीतने सांगितले.

‘‘विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धामध्ये विजयी सुरुवात आवश्यक असते. त्यामुळे या वेळीही विजयी प्रांरभासाठी आम्ही आतुर आहोत. तसेच संघात दडपण हाताळण्यासाठी अन्य अनुभवी खेळाडू असून युवांनी बिनधास्तपणे नैसर्गिक खेळ करावा,’’ असेही हरमनप्रीत म्हणाली. भारताच्या संघात रिचा घोष, शेफाली वर्मा, राधा यादव यांसारख्या किशोरवयीन खेळाडूंचा समावेश आहे.

लीग क्रिकेट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा भिन्न – रामन

जगभरात खेळल्या जाणाऱ्या विविध क्रिकेट लीगमध्ये भारताचे ठरावीक खेळाडू सहभागी होत असले तरी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा फायदा होईलच, असे तुम्ही ठामपणे सांगू शकत नाही, असे मत भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक डब्ल्यू. वी. रामन यांनी मांडले. भारताच्या हरमनप्रीत, स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज बिग बॅश लीग, किया लीग यांसारख्या स्पर्धेत खेळतात. ‘‘जगभरातील लीगना माझा विरोध नक्कीच नाही. मात्र आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव वेगळाच असून येथे तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व करत असल्याने तुमची खरी कसोटी लागते,’’ असे रामन म्हणाले. ‘‘त्यामुळे भारतीय संघातील काही खेळाडू ऑस्ट्रेलियातील लीगमध्ये खेळले असले, तरी प्रत्यक्ष विश्वचषकात त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी असेल. मात्र त्यांनी लीगच्या अनुभवाचा योग्य उपयोग करणे गरजेचे आहे,’’ असेही रामन यांनी सांगितले.