अखेरच्या गट सामन्यात चीनचे आव्हान
सलग दोन विजयाची शिदोरी पाठीशी बांधून आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ सातत्यपूर्ण खेळ करून विजयपथावर राहण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. कनिष्ठ पुरुष आशिया चषक हॉकी स्पध्रेतील अखेरच्या गट सामन्यात भारतासमोर मंगळवारी चीनचे आव्हान आहे.
‘अ’ गटात भारतीय संघ सहा गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. भारताने पहिल्या लढतीत जपानवर २-१ असा, तर दुसऱ्या लढतीत मलेशियावर ५-४ असा विजय साजरा केला आहे. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्के करण्यासाठी भारताला मंगळवारच्या लढतीत अनिर्णीत निकालही पुरेसा आहे, परंतु चीनला आगेकूच करण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्यामुळे चीनकडून कडवा संघर्ष पाहायला मिळेल, हे निश्चित.
‘‘एका दिवसाच्या विश्रांतीमुळे आम्हाला स्पध्रेतील संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यास मदत मिळाली आहे. त्यामुळे ज्या विभागात संघ कमकुवत आहे, त्यावर सुधारणा करणे शक्य आहे. आम्ही कसून सराव केला आहे आणि बचावफळीतील त्रुटी भरून काढण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यामुळे चीनविरुद्ध संतुलित खेळाची अपेक्षा आहे,’’ असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी व्यक्त केले.
सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून