भारताच्या मर्यादित षटकांच्या सामन्यासाठीचा उपकर्णधार रोहित शर्माला पायाच्या दुखापतीमुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघातून वगळण्यात आले. परंतु हाच सलामीवीर सोमवारी सायंकाळी मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात फलंदाजी करताना आढळल्याने त्याच्या तंदुरुस्तीबाबत चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

सुनील जोशी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीने सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही मालिकांसाठी भारताचा संघ जाहीर केला. यामध्ये रोहितला एकाही संघात स्थान देण्यात आलेले नसून मांडीला झालेल्या दुखापतीमुळे त्याला वगळण्यात आले आहे. रोहितच्या अनुपस्थितीत के. एल. राहुल हा एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिके त उपकर्णधाराची भूमिका बजावणार आहे. २७ नोव्हेंबरपासून एकदिवसीय सामन्याद्वारे भारताच्या प्रदीर्घ ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा प्रारंभ होणार आहे.

३३ वर्षीय रोहितला १८ ऑक्टोबर रोजी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना डाव्या पायाच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले. परंतु सोमवारी सायंकाळी मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावर रोहितची सराव करतानाची चित्रफीत जारी करण्यात आली. याशिवाय ३ नोव्हेंबर रोजी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या साखळी लढतीसाठी रोहित उपलब्ध असण्याची शक्यता आहे, असेही संघ व्यवस्थापनाने सांगितले. त्यामुळे रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी का वगळण्यात आले, असा प्रश्न चाहत्यांसह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंना पडला आहे.

‘‘जर ‘आयपीएल’च्या अखेरच्या आठवडय़ात रोहित खेळताना आढळला, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याचा नक्कीच विचार केला जाऊ शकतो. या दौऱ्यात निवड होण्यासाठी त्याला पुन्हा स्वतंत्र तंदुरुस्ती चाचणी देण्याची गरज नाही,’’ असे रोहितशी खास संबंध असलेल्या एका व्यक्तीने सांगितले.

दरम्यान, रोहितला वगळल्यामुळे समाजमाध्यमांवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी त्याच्या तंदुरुस्तीबरोबरच खिलाडूवृत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रोहित जायबंदी असल्याने त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वगळण्यात आल्याचे मत समालोचक हर्ष भोगले, आकाश चोप्रा यांनी व्यक्त केले. त्यामुळे तो उर्वरित ‘आयपीएल’लासुद्धा मुकणार, असाच सर्वाचा समज झाला आहे. परंतु काही क्रीडाप्रेमींनी रोहितने नेहमीप्रमाणे महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी दुखापतीचे कारण पुढे करत माघार घेतल्याचा टोला लगावला आहे. त्याशिवाय त्याचे वाढते वजन आणि शरीरयष्टी यावरूनही रोहितला अनेकांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून फक्त ‘आयपीएल’मध्ये खेळण्याचाच सल्ला दिला आहे.

कारण जाणून घेण्याचा अधिकार -गावस्कर

दुबई : रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या एकाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. मात्र त्याची दुखापत खरंच इतकी गंभीर आहे का, हे जाणून घेण्याचा अधिकार भारतीय क्रिकेटप्रेमींना आहे, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली. ‘‘मुंबई इंडियन्ससाठी जर रोहित सराव करू शकतो, तर मग ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड का करण्यात आलेली नाही. नक्की त्याची दुखापत कितपत गंभीर आहे, हे मला अनाकलनीय आहे. रोहितने स्वत:हून या दौऱ्यातून विश्रांती घेण्यासाठी माघार घेतली का अथवा निवड समितीने त्याच्या तंदुरुस्तीचा आढावा न घेताच संघ जाहीर केले,’’ असे अनेक प्रश्न गावस्करांनी ‘बीसीसीआय’ला विचारले आहेत.