भारताच्या क्रीडा प्रशिक्षकांवर असणारी दोन लाख रुपयांची पगाराची मर्यादा क्रीडा मंत्रालयाने हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चांगले माजी खेळाडू प्रशिक्षक म्हणून खेळाकडे यावेत, याच उद्देशाने पगाराची मर्यादा दूर करण्यात आल्याचे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे.

परदेशी प्रशिक्षकांचा करार पुढील वर्षी ३० सप्टेंबपर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी घेतलेला निर्णयही महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. ‘‘भारताचे अनेक प्रशिक्षक खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घेत असल्याचे दिसले आहे. त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ  दिले पाहिजे. देशातील चांगले प्रशिक्षक आम्हाला हवे आहेत, जेणेकरून मुख्य खेळाडूंना ते प्रशिक्षण देऊ शकतात. चांगले प्रशिक्षक निवडताना पगाराची असणारी मर्यादा म्हणून आम्ही दूर केली आहे,’’ असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

‘‘मानधन वाढवल्याने तसेच करार वाढवल्याने चांगले प्रशिक्षक मिळतील. त्याचा फायदा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसारख्या मोठय़ा स्पर्धामध्ये होईल,’’ असे रिजिजू यांनी सांगितले.

गोपीचंद यांच्याकडून स्वागत

भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘‘प्रशिक्षकांच्या मानधनाबाबतीत मर्यादा दूर करावी, अशी मागणी सातत्याने क्रीडा क्षेत्राकडून होत होती. या निर्णयामुळे मला खूप आनंद झाला आहे. विविध खेळांमधील अनेक माजी खेळाडू प्रशिक्षक म्हणून पुढे येण्यास मदत होणार आहे,’’ असे गोपीचंद यांनी म्हटले.