टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा यावर्षी झाली असती तर भारतीय पुरुष हॉकी संघाला बऱ्याच वर्षांनी पदकाचा दुष्काळ संपवण्याची संधी मिळाली असती. मात्र आता पुढील वर्षी लांबणीवर पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी संघाला सातत्य राखणे आव्हानात्मक असेल, असे मत विश्वचषक विजेते माजी हॉकीपटू अशोक कुमार यांनी व्यक्त केले आहे.

अशोक कुमार हे १९७५च्या विश्वविजेत्या आणि म्युनिक ऑलिम्पिकच्या कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाचे प्रमुख सदस्य होते. ‘‘२०१९ मध्ये भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा झाली असती तर भारताच्या पदकाची संधी होती. भारतीय संघाने आपल्या कामगिरीत सुधारणा केली असून बलाढय़ संघांना तोडीस तोड उत्तर दिले आहे. आता मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पुढील वर्षी अधिक जोमाने तयारी करावी लागेल,’’ असे अशोक कुमार यांनी सांगितले.

१९७५च्या विश्वचषकाच्या अंतिम फे रीत अशोक कु मार यांनी पाकिस्तानविरुद्ध महत्त्वपूर्ण गोल साकारला होता. ‘‘भारतीय संघ लयीत असताना ती खंडित झाली आहे. आता भारतीय संघाच्या कामगिरीबाबत काहीच सांगता येणार नाही. ऑलिम्पिकआधीच्या स्पर्धामध्ये भारतीय हॉकी संघाची कामगिरी कशी होते, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे,’’ असेही अशोक कुमार म्हणाले.

हॉकी संघाच्या सराव शिबिराला विलंब

नवी दिल्ली : भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाच्या सराव शिबिराला १९ जुलैपासून बेंगळूरुतील भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साइ) प्रारंभ करण्यात येणार होता. पण बेंगळूरुमध्ये टाळेबंदीचा कालावधी सात दिवसांनी वाढवण्यात आल्यामुळे सराव शिबिराला विलंब लागणार आहे. ‘‘हॉकी सराव शिबीर करण्याविषयी आम्हाला अद्याप कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे खेळाडूंना घरी जाण्याची परवानगी देण्यात येतील. टाळेबंदीचा कालावधी २२ जुलैपर्यंत असल्यामुळे सराव शिबीर सुरू करणे अशक्य आहे,’’ असे ‘साइ’ के ंद्राच्या वतीने सांगण्यात आले.