करोनामुळे केलेल्या वेळापत्रकातील बदलास टेनिसपटूंचा विरोध

न्यूयॉर्क : फ्रेंच ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धा पुढे ढकलून अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा झाल्यानंतर घेण्याच्या योजनेमुळे वाद निर्माण झाला असून, मातब्बर टेनिसपटूंनी त्याला विरोध के ला आहे.

करोनामुळे मे महिन्यात होणारी फ्रेंच ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धा २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करणार असल्याचे घोषित करण्यात आले. मात्र या तारखा म्हणजे २४ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या अमेरिकन खुली ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धा संपल्यानंतर एका आठवडय़ानंतरच्या आहेत. या स्पर्धेनंतर अमेरिकेतील बोस्टन येथे लेव्हर चषक टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यात स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररसारखे अव्वल खेळाडू सहभागी होणार आहेत.

लेव्हर चषक टेनिस स्पर्धेदरम्यानच फ्रेंच ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धा आयोजित करण्याचे संकेत दिल्यामुळे टीकेची झोड उठली आहे. २४  मेपासून प्रस्तावित असणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या आयोजकांनी कोणाशीही चर्चा न करता थेट स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.  त्यातच व्यावसायिक पुरुष टेनिस संघटना (एटीपी)  आणि महिला टेनिस संघटनेच्या (डब्ल्यूटीए) स्पर्धा याआधीच एप्रिल आणि मेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.  फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या आयोजकांनी थेट स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असला तरी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या आयोजकांनी तसा निर्णय दिलेला नाही. ‘‘करोनामुळे अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा सध्या तरी विचार नाही,’’ असे अमेरिकन टेनिस संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टेनिस जगतातून  फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दोन ग्रॅँडस्लॅम विजेत्या जपानच्या नाओमी ओसाकाने ही स्पर्धा पुढे ढकलल्याने नाराजी व्यक्त केली आहे.