नोंदणीकृत क्रिकेटपटूंनी वयचोरीचा गुन्हा केल्याची स्वत:हून कबुली दिल्यास त्यांना माफ करण्यात येईल. परंतु वयचोरी मान्य न केलेले खेळाडू दोषी आढळल्यास त्यांना दोन वर्षांच्या निलंबनाची शिक्षा भोगावी लागेल, असे सर्व वयोगटांच्या क्रिकेटसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केले.

करोनानंतरच्या काळात भारतातील २०२०-२१ या हंगामासाठी ‘बीसीसीआय’ने या नव्या नियमाची घोषणा केली आहे. त्यानुसार हा नियम ‘बीसीसीआय’मधील सर्व वयोगटांतील क्रिकेटपटूंसाठी लागू होणार आहे.

‘‘जर खेळाडूंनी यापूर्वी चुकीच्या जन्मतारखेचा दाखला दिल्याचे आताच मान्य केले, तर त्यांच्या सध्याच्या वयानुसार त्यांना संबंधित वयोगटांच्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी करून घेऊ. मात्र जर चौकशीदरम्यान त्यांनी वयचोरी केल्याचे निदर्शनास आले, तर संबंधित क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी घालू. पुढील महिन्यात १५ सप्टेंबपर्यंत क्रिकेटपटूंनी ‘बीसीसीआय’कडे यासंबंधी पुरावे जमा करावे,’’ असे ‘बीसीसीआय’ने सांगितले.

‘‘त्याशिवाय भविष्यात एखाद्या नोंदणीकृत खेळाडूने वयचोरी केली आणि त्याने स्वत:हून मान्य केल्यास त्याला क्षमा करण्यात येईल. परंतु ‘बीसीसीआय’ने यामागील शोध घेतल्यास त्या खेळाडूवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात येईल. त्यानुसार त्याला कोणत्याही प्रकारच्या वयोगटातील सामन्यात सहभागी होता येणार नाही,’’ असेही ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले.

द्रविडने यासंदर्भात दोषी खेळाडूंनी स्वत:हून पुढे यावे असे म्हटले आहे. ‘‘वयचोरी हा गंभीर प्रकार आहे. खेळासाठीदेखील योग्य नाही. बीसीसीआयने याद्वारे खेळाडूंना त्यांची वयचोरीबाबतची चूक मान्य करण्याची संधी दिली आहे. वयचोरी केली असल्यास खेळाडूंनी स्वत:हून कबुली द्यावी,’’ असे द्रविड म्हणाला.

६० वर्षांवरील व्यक्तींना सराव केंद्रावर मनाई

सरावाला प्रारंभ करण्यापूर्वी प्रत्येक खेळाडूने संमतिपत्रावर स्वाक्षरी करण्याबरोबरच संघ व्यवस्थापनातील ६० वर्षांवरील व्यक्तींना सराव केंद्रावर प्रवेश नाकारण्यात यावा, असे ‘बीसीसीआय’ने प्रमाणित कार्यपद्धतीच्या अंतर्गत राज्य क्रिकेट संघटनांना पाठवलेल्या अहवालात नमूद केले आहे. ‘‘खेळपट्टी निरीक्षक तसेच संघ व्यवस्थापनाशी निगडित ६० वर्षांवरील एकाही व्यक्तीला केंद्र शासनाच्या परवानगीशिवाय सराव केंद्रावर प्रवेश करण्यास मनाई असून खेळाडूंनासुद्धा सरावाला प्रारंभ करण्यापूर्वी संमतिपत्रावर हस्ताक्षर करणे गरजेचे आहे. सराव शिबिरापूर्वी प्रत्येकाने दोन आठवडय़ांपूर्वीचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले. त्याशिवाय हॉटेलपासून स्टेडियमपर्यंतच्या प्रवासादरम्यान एन-९५ मुखपट्टी वापरणे, वैयक्तिक प्रवासाची सोय करणे, सराव शिबिराच्या १० दिवसांपूर्वी दोन वेळा करोना चाचण्या करणेही सर्वाना अनिवार्य आहे.

अरुण लाल, व्हॉटमोर यांचा सरावात सहभाग नाही

अरुण लाल हे बंगालचे प्रशिक्षक असून बडोदाचे ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक डेव्ह व्हॉटमोर हे दोघेही ६० वर्षांवरील आहेत. या स्थितीत सध्याच्या नियमांप्रमाणे ६० वर्षांवरील व्यक्तींना शिबिरात सहभाग घेता येणार नाही. व्हॉटमोर हे ६६ वर्षांचे असून बडोदाचे प्रशिक्षक म्हणून त्यांची एप्रिलमध्ये नियुक्ती झाली होती. अरुण लाल हे ६५ वर्षांचे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली बंगालने यंदा रणजी चषकाची अंतिम फेरी गाठली होती.