चौथ्या कसोटीत भारताने अनपेक्षितरीत्या शरणागती पत्करली आणि इंग्लंडला मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक अतिशय खुशीत होता. पहिल्या डावात २१५ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताचा दुसरा डाव तिसऱ्या दिवशी फक्त १६१ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडला एक डाव आणि ५४ धावांनी कसोटी सामना खिशात घालता आला, याबाबत कुकने आश्चर्य प्रकट केले.
‘‘एक सत्रात तुम्हाला नेहमीच नऊ बळी मिळू शकत नाहीत. चहापानाच्या वेळी दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताचे सहा फलंदाज बाद करण्याची योजना तयार केली होती. आमच्याकडे एक गोलंदाज कमी असल्यामुळे योजनेच्या यशाबाबत साशंकता होती. परंतु जे काही घडले ते अनपेक्षित होते,’’ असे कुकने स्मित करीत सांगितले.