18 November 2017

News Flash

‘कुक’स्पर्श!

पहिल्या कसोटी सामन्यामध्ये जल्लोषात विजय साकारण्याचे भारताचे स्वप्न चौथ्या दिवसअखेर तरी अधांतरी आहे. इंग्लंडने

पी.टी.आय. ,अहमदाबाद | Updated: November 19, 2012 2:10 AM

पहिल्या कसोटी सामन्यामध्ये जल्लोषात विजय साकारण्याचे भारताचे स्वप्न चौथ्या दिवसअखेर तरी अधांतरी आहे. इंग्लंडने डावाने पराभव टाळला आहे. परंतु सोमवारी पाचव्या आणि अखेरच्या दिवशी पराजय टाळण्यासाठी त्यांना शर्थीने प्रयत्न करावे लागणार आहेत. इंग्लिश संघनायक अ‍ॅलिस्टर कुक १६८ धावांवर खेळतो आहे, हीच त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. ‘कुक’स्पर्शामुळे तगलेल्या इंग्लंडच्या आशा-आकांक्षांचा डाव अखेरच्या पाच फलंदाजांवर अवलंबून आहे. त्यामुळे सोमवारचा दिवस रंगतदार ठरणार आहे.
सरदार पटेल स्टेडियमवरील फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर इंग्लंड संघाने पहिल्या डावात फक्त १९१ धावांवर लोटांगण घातले. पण त्यानंतर दुसऱ्या डावात २७ वर्षीय कुक भारत आणि विजयाच्या आड भिंतीसारखा उभा राहिला आहे. फिरकीच्या आव्हानापुढे समोरील साथीदार धारातीर्थी पडत असतानाही हा खंदा नायक जिद्दीने लढला. त्याने रविवारी आपल्या कसोटी कारकीर्दीतील २१वे शतक साकारले. त्यामुळे चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने ५ बाद ३४० अशी मजल मारली होती.
भारतीय गोलंदाजांची गय न करता कुकने मॅट प्रायर(खेळत आहे ८४)समवेत किल्ला लढविताना सहाव्या विकेटसाठी नाबाद १४१ धावांची भागीदारी केली. भारतीय फिरकी गोलंदाजांचे या सामन्यावर संपूर्ण वर्चस्व अपेक्षित होते, परंतु त्यांना बळी मिळविण्यासाठी रविवारी बरेच झगडावे लागत होते.
इंग्लंडने ३३० धावांची पिछाडी भरून काढली असून, आता त्यांच्याकडे १० धावांची आघाडी आहे. त्यामुळे कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाची उत्कंठा टिकून आहे. सोमवारी उर्वरित पाच बळी घेत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेण्याचे मनसुबे भारताने रचले आहेत. याचप्रमाणे इंग्लंडने पाचव्या दिवशी शक्य होईल तोवर फलंदाजी करीत भारतावरील दडपण वाढविण्याचे निश्चित केले आहे.
रविवारी सकाळी बिनबाद १११वरून इंग्लंडने आपल्या डावाला पुढे प्रारंभ केला. निक कॉम्प्टन (३७) याच्यासमवेत कुकने १२३ धावांची दमदार सलामी दिली. झहीर खानने कॉम्प्टनला पायचीत करून ही जोडी फोडली. त्यानंतर जोनाथन ट्रॉट (१७), केव्हिन पीटरसन (२), इयान बेल (२२) आणि समित पटेल (०) हे भरवशाचे फलंदाज लवकर बाद झाल्यामुळे इंग्लंडची ५ बाद १९९ अशी अवस्था झाली. पहिल्या कसोटीच्या विजयाची चाहूल भारताला जाणवू लागली, पण कुक मात्र खंबीरपणे उभा होता. संपूर्ण दिवसभर कुक संयमाने खेळपट्टीवर टिकून राहिला.
इंग्लंडचा पराभव टाळण्यासाठी तब्बल साडेआठ तास मैदानावर लढणाऱ्या कुकने ३४१ चेंडूंत २० चौकारांनिशी आपली खेळी साकारली. तसेच प्रायरने १९० चेंडूंत १० चौकारांसह अर्धशतक साकारून त्याला छान साथ दिली.    

धावफलक
भारत (पहिला डाव) : ८ बाद ५२१ (डाव घोषित).
इंग्लंड (पहिला डाव) : १९१
इंग्लंड (दुसरा डाव) : अ‍ॅलिस्टर कुक खेळत आहे १६८, निक कॉम्प्टन पायचीत गो. झहीर खान ३७, जोनाथन ट्रॉट झे. धोनी गो. ओझा १७, केव्हिन पीटरसन त्रिफळा गो. ओझा २, इयान बेल पायचीत गो. यादव २२, समित पटेल पायचीत गो. यादव ०, मॅट प्रायर खेळत आहे ८४, अवांतर १०, एकूण १२८ षटकांत ५ बाद ३४०
बाद क्रम : १-१२३, २-१५६, ३-१६०, ४-१९९, ५-१९९
गोलंदाजी : उमेश यादव १९-१-६०-२, प्रग्यान ओझा ४४-१३-१०२-२, आर. अश्विन ४१-९-१०४-०, वीरेंद्र सेहवाग १-०-१-०, झहीर खान १८-३-३८-१, सचिन तेंडुलकर १-०-८-०, युवराज सिंग ४-०-१७-०.     

खेळपट्टी पाटा बनली असून गोलंदाजांना कोणतीही मदत मिळत नाहीये. त्यामुळे विकेट्स मिळवण्यासाठी आम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि संयमही बाळगावा लागणार आहे.
  उमेश यादव, भारताचा वेगवान गोलंदाज

अ‍ॅलिस्टर कुक आणि मॅट प्रायर यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीचे कौतुक करावेसे वाटते. पण तरीही भारत विजयाच्या वाटेवर आहे. पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला प्रत्येक चेंडूवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
  ग्रॅहम गूच, इंग्लंडचे प्रशिक्षक

आजीच्या अंत्यदर्शनासाठी गंभीर दिल्लीला
 अहमदाबाद : इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी आजीचे निधन झाल्याचे वृत्त कळल्यामुळे भारताचा सलामीवीर गौतम गंभीर दिल्लीला रवाना झाला. प्रसारमाध्यम व्यवस्थापक विनोद देशपांडे यांनी सांगितले की, ‘‘आजीचे निधन झाल्यामुळे  तिच्या अंत्यदर्शनासाठी गंभीर दिल्लीला गेला आहे. सोमवारी तो संघात सामील होईल.’’ गंभीरऐवजी राखीव खेळाडू अजिंक्य रहाणेने रविवारी क्षेत्ररक्षण केले.

First Published on November 19, 2012 2:10 am

Web Title: cook touch