फ्रँक फाबराचा स्वयंगोल निर्णायक ठरला

जोहान व्हेनेगास (दुसऱ्या मि.) आणि केल्सो बोर्गेस (५८व्या मि.) यांच्या प्रत्येकी एकेक गोलला कोलंबियाच्या स्वयंगोलची मिळालेली साथ महत्त्वाची ठरली. त्यामुळे कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेतील ‘अ’ गटात कोस्टा रिकाने कोलंबियावर ३-२ असा धक्कादायक विजय मिळवला.

कोलंबियाने मंगळवारी पेराग्वेला नमवून आधीच उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले होते. त्यामुळे या सामन्यात त्यांनी रिअल माद्रिदचा आघाडीचा फुटबॉलपटू जेम्स रॉड्रिगेझला पहिल्या सत्रात विश्रांती दिली. मात्र शनिवारच्या अन्य लढतीत अमेरिकेने पेराग्वेला हरवल्यामुळे कोस्टा रिकाचे आव्हान संपुष्टात आले. कोस्टा रिकाच्या आश्चर्यकारक विजयामुळे अमेरिकेने ‘अ’ गटातील अव्वल स्थान काबीज केले आहे.

या पराभवामुळे कोलंबियाचा बाद फेरीतील प्रवास आणखी आव्हानात्मक ठरणार आहे. आता न्यू जर्सी येथे होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कोलंबियाची ब्राझीलशी गाठ पडण्याची शक्यता आहे.

फ्रँक फाबरा (७व्या मि.) आणि मार्लोस मोरेनो (७३व्या मि.) यांनी कोलंबियासाठी गोल झळकावले. फाबराच्या (३४व्या मि.) स्वयंगोलमुळे कोस्टा रिकाला पहिल्या सत्रात आघाडी घेण्याची संधी मिळाली. पहिल्या दोन्ही सामन्यांत कोस्टा रिकाने एकही गोल झळकावला नव्हता. २०११मध्ये कोस्टा रिकाने बोलिव्हाचा २-० असा पराभव केला होता. त्यानंतर व्हेनेगासने संघाचा पहिलावहिला गोल साकारला. या सामन्याला ४५ हजार ८०८ प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.

अमेरिका उपांत्यपूर्व फेरीत

दुसऱ्या लढतीत क्लिंट डेम्सेच्या एकमेव गोलच्या बळावर यजमान अमेरिकेने पेराग्वेचा १-० असा पराभव केला आणि गटविजेत्याच्या थाटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. डेम्पसेने २७व्या मिनिटाला साकारलेला गोल महत्त्वाचा ठरला. पेराग्वेच्या आक्रमकपटूंनी अमेरिकेच्या अध्र्या भागात जोरदार खेळ केला. मात्र अमेरिकेची बचाव फळी त्यांना भेदण्यात अपयश आले.