यूरो चषक २०२० स्पर्धेसोबत कोपा अमेरिका स्पर्धेची रंगतही वाढू लागली आहे. शनिवारी कोपा अमेरिका स्पर्धेतील दोन सामने पार पडले. ‘ब’ गटात अर्जेंटिना विरुद्ध उरुग्वे आणि चिले विरुद्ध बोलिविया हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात अर्जेंटिना आणि चिलेने विजयी पताका फडकावली. या विजयासह अर्जेंटिनाचा संघ ‘ब’ गटातील गुणतालिकेत अव्वल स्थानी, चिलेचा संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

कोपा अमेरिका स्पर्धेत चिले विरुद्ध बोलिविया यांच्यात रंगलेल्या सामन्यात चिलेने बाजी मारली. चिलेने बोलिविया संघाचा १-० ने पराभव केला. पहिल्या सत्रात चिलेच्या बेन ब्रेरेटॉननं गोल मारत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात बोलिविया संघावर दडपण कायम राहिलं. सामन्यात बरोबरी साधण्यासाठी त्यांची दमछाक झाली. त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. या सामन्यासाठी चिलेने ४-३-३, तर बोलिवियाने ४-४-२ अशी व्यूहरचना आखली होती. या सामन्यात फुटबॉलवर सर्वाधिक पकड ही चिलेची होती. त्यांनी ६२ टक्के म्हणजेच ६६० वेळा एकमेकांकडे फुटबॉल पास केला. तर बोलिविया संघ फुटबॉलचा ताबा मिळवण्यासाठी झगडताना दिसला. बोलिवियाच्या खेळाडूंकडे ३८ टक्के म्हणजेत एकमेकांना ४१३ वेळा फुटबॉल पास केला. या सामन्यात बोलिवियाचा दोन, तर चिलेच्या एका खेळाडूला पिवळं कार्ड दाखवण्यात आलं.

कोपा अमेरिका स्पर्धेतील दुसरा सामना अर्जेंटिना आणि उरुग्वे या दोन संघात रंगला. हा सामना अर्जेंटिनाने १-० ने जिंकला. या विजयासह अर्जेंटिनाचा संघ ‘ब’ गटात अव्वल स्थानी पोहोचला आहे. या सामन्यात मेस्सीने गायडो रॉड्रिग्सकडे बॉल पास केला आणि त्यानेही संधीचं सोनं करत गोल झळकावला. पहिल्या सत्रात एका गोलची आघाडी मिळाल्यानंतर उरुग्वेचा संघ बरोबरी करण्यासाठी धडपडत राहिला. या सामन्यासाठी अर्जेंटिनाने ४-३-३ आणि उरुग्वेने ४-४-२ अशी व्यूहरचना आखली होती. अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी जास्तीत जास्त वेळ फुटबॉल आपल्या ताब्यात ठेवण्याच प्रयत्न केला. ४५ टक्के म्हणजे ४५६ वेळा खेळाडूंनी एकमेकांना पास दिला.तर उरुग्वेने ५५ टक्के म्हणजेच ५५३ वेळा फुटबॉल एकमेकांना पास केला. या सामन्यात उरुग्वेच्या २, तर अर्जेंटिनाच्या ३ खेळाडूंना पिवळं कार्ड दाखवण्यात आलं.