साव पावलो : कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत रविवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात अँजेल मीनाने केलेल्या महत्त्वपूर्ण गोलमुळे इक्वेडोरने बलाढय़ ब्राझिलला १-१ असे बरोबरीत रोखून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

इक्वेडोरला उपांत्यपूर्व फेरीत मजल मारण्यासाठी अखेरच्या साखळी सामन्यात ब्राझिलला किमान बरोबरीत रोखण्याबरोबरच अन्य लढतीत पेरूने व्हेनेझुएलावर मात करणे गरजेचे होते. ऑलिम्पिको स्टेडियम येथे झालेल्या ‘ब’ गटातील या लढतीसाठी ब्राझिलने नेयमार, गॅब्रिएल जिजस आणि थिआगो सिल्व्हा यांना विश्रांती दिली. एडर मिलिटाओने ३७व्या मिनिटाला हेडरद्वारे ब्राझिलसाठी गोल नोंदवला. मध्यांतरापर्यंत ब्राझिलला आघाडी टिकवण्यात यश आले.

दुसऱ्या सत्रात मात्र इक्वेडोरने अधिक प्रभावी खेळ केला. अखेर ५३व्या मिनिटाला व्हॅलेन्सियाने दिलेल्या पासवर मीनाने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवत इक्वेडोरला बरोबरी साधून दिली. यामुळे इक्वेडोरने चौथ्या स्थानासह पुढील फेरी गाठली. ब्राझिल, पेरू आणि कोलंबिया या संघांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. अन्य लढतीत आंद्रे कॅरिलोने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर पेरूने व्हेनेझुएलावर १-० असा विजय मिळवून त्यांचे आव्हान संपुष्टात आणले.