बार्सिलोनाला २-१ने पराभवाचा धक्का देत विजेतेपदावर मोहोर

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहज मजल मारण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्यानंतर या मोसमाच्या अखेरीस बार्सिलोनाला आणखी एक धक्का पचवावा लागणार आहे. शनिवारी झालेल्या कोपा डेल रे चषकाच्या अंतिम सामन्यात व्हॅलेंसियाने बार्सिलोनाला २-१ असा पराभवाचा धक्का देत विजेतेपदावर मोहोर उमटवली.

सलग पाचव्यांदा कोपा डेल रे चषकाचे विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झालेल्या बार्सिलोनाला व्हॅलेंसियाने सुरुवातीलाच दोन गोल करत अडचणीत आणले. त्यानंतर अखेरच्या क्षणी लिओनेल मेसीने गोल करत बार्सिलोनाला सामन्यात पुनरागमन करून दिले. पण त्यानंतर गोल करण्याच्या अनेक संधी बार्सिलोनाने वाया घालवल्या.

२००८मध्ये या स्पर्धेचे अखेरचे जेतेपद पटकावणारा व्हॅलेंसिया संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करत असतानाच त्यांना या मोसमात फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. केव्हिन गामेरो याने २१व्या मिनिटाला पहिला गोल करत व्हॅलेंसियाला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर रॉड्रिगो याने ३३व्या मिनिटाला दुसऱ्या गोलची भर घालत ही आघाडी २-० अशी वाढवली. मार्क-आंद्रे टेर स्टेगान, लुइस सुआरेझ आणि औसमाने डेम्बेले या जायबंदी खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या बार्सिलोनाची भिस्त मेसीवर होती. मेसीनेही ७३व्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते खोलले. त्यानंतर संधी मिळूनही बरोबरी साधणारा गोल करता न आल्याने बार्सिलोनाला पराभवाला सामोरे जावे लागले.