करोनामुळे सामानाची ने-आण करण्यासाठी उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेता अझरबैजान, जपान आणि सिंगापूरमधील आगामी फॉर्म्युला-वन लढती रद्द करण्यात आल्या आहेत.

अझरबैजान आणि सिंगापूरमध्ये रस्त्यांवर शर्यती आयोजित करण्यात येणार होत्या, पण करोना संकटामुळे उद्भवणारी आव्हाने पाहता या दोन्ही शर्यती रद्द करण्यात आल्या आहेत. जपानमधील प्रवासावरील निर्बंधामुळे जपान ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यत रद्द करण्यात आली आहे. ‘‘संयोजकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींमुळे शर्यतींचे आयोजन करणे अशक्य होते. त्यामुळेच या शर्यती रद्द करण्यात आल्या आहेत,’’ असे फॉर्म्युला-वन संघटनेकडून सांगण्यात आले.

जून महिन्यात फॉर्म्युला-वनचे सुधारित वेळापत्रक सादर करण्यात आले होते. आठ शर्यतींचा सहभाग असलेल्या या मोसमातील पहिल्या दोन शर्यती ऑस्ट्रियामध्ये ७ जुलै रोजी रंगणार आहेत. या तीन शर्यती रद्द झाल्यामुळे फॉर्म्युला-वन संघटनेला आता युरोपातील पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. नेदरलँड्स, मोनॅको आणि फ्रान्समधील शर्यतीही रद्द झाल्या आहेत.