28 September 2020

News Flash

क्रीडा साहित्य विक्री उद्योगाला करोनाचा फटका!

कॅरमची मागणी प्रचंड वाढली!

संग्रहित छायाचित्र

प्रशांत केणी

करोनाच्या साथीमुळे गेले चार महिने लागू असलेल्या टाळेबंदीचा क्रीडा साहित्य विक्री उद्योगाला मोठा फटका बसला आहे. क्रीडा साहित्य विक्रीच्या धोबी तलाव येथील बाजारपेठेसह देशभरातील दुकानांना त्याची तीव्र झळ बसल्याने दुकानदार हवालदिल झाले आहेत. क्रीडा साहित्य विक्रीच्या दुकानांना १ जूनपासून दिवसाआड परवानगी मिळाली असली तरी मैदाने ओस पडल्याने ही बाजारपेठ मात्र सुनीच आहे.

गेल्या काही वर्षांत क्रीडा साहित्याची ऑनलाइन विक्री वाढल्याने आधीच दुकानदारांचे कंबरडे मोडले आहे. यात वस्तू आणि सेवा करात वाढ झाल्याने भर पडली होती. भारत-चीन सीमेवरील संघर्षांनंतर क्रीडा साहित्य आयातीबाबत कोणते धोरण ठरते, याबाबत उत्सुकता होती. पण सद्य:स्थितीत मागणीच नसल्याने त्याचे गांभीर्यच उरले नाही. ‘‘करोनाच्या साथीमुळे मैदाने, शाळा-महाविद्यालये, जिमखाने, जलतरण केंद्रे, व्यायामशाळा बंद पडले आहेत. मग क्रीडा साहित्य कोण खरेदी करणार,’’ असा सवाल महाराष्ट्र क्रीडा आणि तंदुरुस्ती साहित्य व्यापार संघटनेचे अध्यक्ष मनोहर वागळे यांनी केला आहे.

‘‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देश-विदेशातील सर्वच व्यक्ती भांबावलेले आहेत. आलेल्या संकटाला कशा रीतीने तोंड द्यावे, हे आम्हालाही समजत नाही. दुकानांचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार, क्रीडा साहित्यासाठीची गुंतवणूक हे अर्थकारण सांभाळताना आम्ही मेटाकुटीला आलो आहोत,’’ अशी वस्तुस्थितीत वागळे यांनी मांडली.

घरातून निघतो, तेव्हा जाऊ नका, असे चिंतेने कुटुंबातली मंडळी आम्हा दुकानदारांना सांगतात. पण करोनाची लागण होईल, या भीतीने दुकाने आम्ही किती दिवस बंद ठेवणार,’’ अशी व्यथा वागळे यांनी मांडली. मुंबईत जवळपास पाचशे क्रीडा साहित्य विक्रीची दुकाने आहेत. मोठे दुकानदार सावरतील, पण छोटय़ा दुकानदारांना टाळेबंदीनंतर टिकणे कठीण जाईल, असे वागळे यांनी सांगितले.

कॅरमची मागणी प्रचंड वाढली!

दर वर्षी पावसाळ्यात फुटबॉलची प्रचंड मागणी वाढते. पण करोनाच्या साथीमुळे यंदा कुणीही फुटबॉल खरेदीसाठी येत नाही. मात्र सध्या घरगुती व्यायामाचे साहित्य खरेदी करण्यास लोक प्राधान्य देतात. याचप्रमाणे घरात अडकलेल्या नागरिकांकडून कॅरमची मागणी तर प्रचंड वाढली आहे. कोणत्याही दुकानातून दिवसाला १०-१२ कॅरम संपायचे. त्यामुळे साठा संपल्याचा प्रत्यय बऱ्याचदा यायचा, असे मत वागळे यांनी व्यक्त केले.

करोनाप्रतिबंधक क्रीडा साहित्यनिर्मिती कठीण!

श्वास घ्यायला त्रास होईल म्हणून संपर्काचे खेळ मुखपट्टी लावून खेळताच येणार नाहीत. त्यामुळे करोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध रोखू शकेल, अशा क्रीडा साहित्याची निर्मिती होणे कठीण आहे, असे विश्लेषण वागळे यांनी केले. ‘‘टेनिस, बॅडमिंटन यांच्यासारख्या खेळांना सद्य:स्थितीत फारशी समस्या येणार नाही. त्यामुळे काही खेळांना परवानगीही देण्यात आली आहे. कारण तिथे सुरक्षित अंतर मुळातच पाळले जाते. फुटबॉल खेळणे धोकादायक असल्याचे म्हटले जात होते. परंतु परदेशात सर्वच लीग सुरू आहेत,’’ याकडेही वागळे यांनी लक्ष वेधले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 12:12 am

Web Title: corona hits the sports goods industry abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 फुटबॉलपटू कॅसियासची निवृत्ती
2 राज्यस्तरीय खेलो इंडियाचे आयोजन करा – रिजिजू
3 Eng vs Ire : कर्णधार मॉर्गनचा धोनीला धोबीपछाड
Just Now!
X