अंतिम फेरीचे भवितव्य अधांतरी; सदस्य राष्ट्रांशी चर्चा करून मालिकांच्या पुनर्आखणीचा ‘आयसीसी’चा प्रयत्न

करोनाच्या साथीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेला मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे. आता द्विराष्ट्रीय मालिकांना सुरुवात झाली असली तरी पुढील वर्षीच्या अंतिम सामन्याचे भवितव्य अधांतरी आहे. त्यामुळे जागतिक कसोटी स्पर्धेच्या पुनर्आखणीबाबत ‘आयसीसी’वरील दडपण वाढले आहे.

करोना विषाणू संसर्गामुळे जागतिक क्रिकेटचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलून देशांना द्विराष्ट्रीय मालिका पूर्ण करण्याची मुभा दिली आहे. बांगलादेश, न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड हे देश प्रलंबित मालिका खेळत आहेत. या परिस्थितीत वेळापत्रकावर कमालीचा ताण आल्यामुळे पुढील वर्षी लॉर्ड्सला होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यापुढे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

‘‘अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पुनरागमनाबाबत अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. ‘आयसीसी’ला प्रत्यक्षात मालिकांच्या आखणीत भूमिका बजावता येत नाही. ते कार्य दोन राष्ट्रांच्या संघटनांनाच करावे लागते,’’ असे ‘आयसीसी’चे महाव्यवस्थापक जेफ ऑलरडाइस यांनी सोमवारी सांगितले.

‘‘२०१८मध्ये जेव्हा ‘आयसीसी’ एकदिवसीय लीगचा प्रस्ताव आला, तेव्हा एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकाराचा समतोल साधण्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे कोणत्याही दौऱ्यात एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेतील सामन्यांची संख्या समान असते,’’ असे ऑलरडाइस यांनी स्पष्ट केले. करोनाच्या साथीचा पुरुषांच्या क्रिकेटपेक्षा महिलांच्या क्रिकेटला प्रचंड फटक बसला आहे. महिला क्रिकेटच्या पुनरागमनाविषयी आमची सदस्य राष्ट्रांशी बोलणी सुरू आहे, असे ते म्हणाले.

२०२३च्या विश्वचषकाची अव्वल साखळी पात्रता फेरी

दुबई : २०२३मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अव्वल साखळी पात्रता फेरीची घोषणा सोमवारी ‘आयसीसी’ने केली. यजमान भारतासह अव्वल साखळीतील सात अन्य संघ विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतील. साऊदम्पटन येथे होणाऱ्या विश्वविजेत्या इंग्लंड आणि आर्यलड यांच्यात ३० जुलैपासून सुरू होणाऱ्या मालिकेने या प्रक्रियेला प्रारंभ होईल. अव्वल साखळीत प्रत्येक संघाला मायदेशात आणि परदेशात प्रत्येकी चार तीन सामन्यांच्या मालिका खेळाव्या लागणार आहेत. २०२३च्या विश्वचषकात १० संघ खेळणार आहेत.

मालिकांच्या पुनर्आखणीबाबत आम्ही सदस्य राष्ट्रांकडून माहिती घेत आहोत. सध्या तरी अंतिम सामना जून २०२१मध्ये होणार असल्याचे वेळापत्रकात नमूद असून, मालिकांच्या नव्या योजनांवर त्याचे भवितव्य अवलंबून आहे.

– जेफ ऑलरडाइस, ‘आयसीसी’चे महाव्यवस्थापक