टोक्यो ऑलिम्पिकसाठी जपानमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक खेळाडू तसेच पदाधिकाऱ्याची करोना चाचणी बंधनकारक असणार आहे. मात्र दोन आठवडय़ांचा विलगीकरण कालावधी अनिवार्य नसल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

पुढील वर्षी लांबणीवर पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिकसाठी करोनाच्या पाश्र्वभूमीवर उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. जपानचे खेळाडू तसेच जपानमध्ये राहणारे अन्य देशाच्या खेळाडूंनाही सराव शिबीर किंवा स्पर्धेसाठी स्टेडियममध्ये जाताना करोना चाचणीचा अहवाल बंधनकारक असणार आहे. टोक्यो संयोजन समिती तसेच जपान सरकार आणि टोक्यो महानगर अधिकाऱ्यांमध्ये संयुक्तपणे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जपानचे नवनियुक्त पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी बुधवारी सकाळी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्याशी आयोजनाबाबत फोनवरून चर्चा केली. खेळाडू तसेच चाहत्यांसाठी सुरक्षितपणे ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन सुगा यांनी दिले आहे.