|| ऋषिकेश बामणे

जगभरातील तमाम नागरिकांना एखाद्या लक्ष्याच्या आशेने एकत्र आणण्याची ताकद फक्त मोजक्या गोष्टींमध्ये असते आणि क्रीडा क्षेत्र हे त्यांपैकीच एक. चाहत्यांमध्ये उत्साह, उत्कंठा, ऊर्जेचा संचार करण्याबरोबरच त्यांना यशापयशाचे महत्त्व पटवून देणे, ही क्रीडा क्षेत्राची वैशिष्ट्ये. त्यामुळे अनेकांची कारकीर्द घडवण्याबरोबरच काहींच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न सोडवणारे क्रीडा क्षेत्र ठप्प पडण्याच्या घटना दुर्मीळच. परंतु जवळपास वर्षभरापूर्वी मार्च महिन्यातील अखेरच्या आठवड्यापासूनच करोनारूपी कर्दनकाळाने भारतासह संपूर्ण विश्वात थैमान घातले आणि महायुद्धांनंतर प्रथमच मैदाने सुनी पडली. आता करोनाच्या वर्षपूर्तीनंतर क्रीडा क्षेत्राची गाडी सावधतेने पुन्हा रुळावर आली आहे, तरीही खेळाडू आणि चाहत्यांच्या मनात भवितव्याविषयीची धगधग सुरूच आहे.

करोना साथीच्या फैलावामुळे २०२० हे वर्ष सर्वांसाठीच आर्थिक, मानसिक तसेच शारीरिकदृष्ट्याही आव्हानात्मक ठरले. त्यामुळे क्रीडा क्षेत्रावरही याचा परिणाम जाणवणे स्वाभाविक होते. क्रिकेटपासून सुरुवात केल्यास भारताची १२ मार्चपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारी एकदिवसीय मालिका त्या वेळी पुढे ढकलण्यात आली. तेथून मग एकामागून एक सर्व पातळीवरील स्पर्धा लांबणीवर पडण्याची अथवा रद्द करण्याची मालिका सुरू झाली. टोक्यो ऑलिम्पिक, ट्वेन्टी-२० विश्वचषक, युरो चषक फुटबॉल, विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस, जागतिक बॅडमिंटन, प्रो कबड्डी लीग, इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट (आयपीएल) यांसारख्या प्रमुख स्पर्धांच्या आयोजनाचा डाव करोनाने हाणून पाडला. कालांतराने क्रीडापटूंनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने क्रीडा क्षेत्र संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली. मे किंबहुना जून महिन्यापर्यंत तरी असेच चित्र कायम होते.

मात्र राखेतून पुन्हा भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे क्रीडा क्षेत्राने त्यातून मार्ग काढला. बदलत्या काळाची गरज लक्षात घेता बुद्धिबळ, कॅरम, नेमबाजी या खेळांनी ऑनलाइन स्पर्धांच्या आयोजनाचा मार्ग स्वीकारून पुढे जाण्याचे ठरवले. कालांतराने जैव-सुरक्षित वातावरणाशी कायमस्वरूपी मैत्री केल्याप्रमाणे खेळाडूंनीही पुन्हा मैदाने गाठली. यामध्ये विदेशातील संघांनी मोलाची भूमिका बजावली. क्रीडा क्षेत्राचा अविभाज्य घटक मानल्या जाणाऱ्या प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत रिकाम्या स्टेडियममध्ये खेळणे ज्याप्रकारे खेळाडूंसाठी अवघड होते, त्याचप्रमाणे चाहत्यांनाही खेळाडूंच्या नावाचा जयघोष न करता सामना पाहणे कठीण गेले. जर्मनी, इंग्लंड या देशांतील क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धांद्वारे क्रीडा क्षेत्राचे पुनरागमन झाले. वेस्ट इंडिजने मग आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेत कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाण्याचे ठरवले.

एकीकडे अन्य देशांत क्रीडा क्षेत्राला चालना मिळत असताना भारतात मात्र करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण कायम होते. अशा परिस्थितीत करोनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याच्या हेतूने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संयुक्त अरब अमिरातीत ‘आयपीएल’च्या १३व्या पर्वाचे आयोजन करण्याचे ठरवले. ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द करण्यात आल्यामुळे ‘आयपीएल’च्या हंगामाला जगभरातील चाहत्यांचा उदंड प्रतिसादही लाभला. परंतु भारतातील क्रीडा क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचे कार्य इंडियन सुपर लीग फुटबॉल म्हणजेच ‘आयएसएल’ने केले.

सात ते आठ महिन्यांच्या कालावधीनंतर गोवा येथे नोव्हेंबरपासून ‘आयएसएल’च्या फुटबॉल कार्निव्हलला प्रारंभ झाला. या स्पर्धेमुळे सर्व गोष्टींची पुरेपूर काळजी घेतल्यास देशात अन्य क्रीडा स्पर्धांचे आयोजनही करता येईल, असा विश्वास संघटना तसेच महासंघांना पटला. केंद्र आणि राज्य शासनाकडून परवानगी मिळाल्यावर मग देशातील क्रीडा मैदाने पुन्हा फुलू लागली. यादरम्यानही करोनाचे सावट मात्र होतेच. कुस्ती, हॉकी या खेळाच्या स्पर्धेतील सराव शिबिरांत काहींना करोनाची बाधा झाली, तर भारतीय बॅडमिंटनपटूंनाही याचा फटका बसला. त्यामुळे अनेकांनी जैव-सुरक्षित वातावरण तसेच विलगीकरणाच्या नियमांबाबत नाराजी व्यक्त केली.

फेब्रुवारीमध्ये भारत-इंग्लंड कसोटी मालिकेद्वारे देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतले. त्यापूर्वी, मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाचा प्रयोग यशस्वी ठरला. मात्र भारतात करोनाची आणखी एक लहर ऐन भरात असून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनावरील प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे. त्याशिवाय जुलै-ऑगस्टमध्ये विदेशी प्रेक्षकांविना होणारे टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा क्षेत्राची खरी कसोटी पाहणारे ठरेल. याव्यतिरिक्त युरो फुटबॉलच्या आयोजनाकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

तूर्तास, वर्षभरानंतरही करोनाची साथ पूर्णपणे नष्ट होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे खेळाडूंभोवती फिरणारे असुरक्षिततेचे चक्र कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र अशा परिस्थितीतही असंख्य अडथळ्यांवर मात करीत क्रीडा क्षेत्राची मशाल भारतासह जगभरात पेटत आहे, हीच समाधानकारक बाब म्हणावी लागेल.

rushikesh.bamne@expressindia.com