|| ऋषिकेश बामणे

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एकीकडे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्थगित करण्यात आल्याने हिरमोड झालेल्या भारतासह जगभरातील क्रीडाप्रेमींना या आठवड्यापासून टेनिसमधील ग्रँडस्लॅम स्पर्धांची रणधुमाळी अनुभवायला मिळणार आहे. चार प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला रविवारपासून प्रारंभ होणार आहे. मात्र यंदाही ‘लाल मातीचा बादशाह’ असे बिरुद मिरवणारा स्पेनचा राफेल नदाल, सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर या अनुभवी त्रिमूर्तीपैकीच एक जण सरशी साधणार की नव्या दमाचे तेजांकित त्यांच्यावर भारी पडणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ग्रास (हिरवळीचे) कोर्ट आणि हार्ड कोर्टच्या तुलनेत लाल मातीवर (क्ले कोर्ट) खेळताना टेनिसपटूचा खरा कस लागतो, असे मानले जाते. ‘विम्बल्डन सम्राट’ फेडरर आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धेचा राजा म्हणून ओळखला जाणारा जोकोव्हिच या दोघांनाही प्रदीर्घ कारकीर्दीत फक्त एकदाच फ्रेंच स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाचे जेतेपद मिळवता आले आहे. त्याउलट ३३ वर्षीय नदालने विक्रमी १३वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. त्याशिवाय फेडरर आणि नदाल दोघांचीही २० ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली असल्याने पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्यांच्या यादीत कोण अग्रस्थान मिळवणार, याकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दोन आठवड्यांपूर्वीच झालेल्या इटालियन चषक या लाल मातीवरील टेनिस स्पर्धेत नदालने जोकोव्हिचला नमवून अजिंक्यपद मिळवले. त्यामुळे आता फ्रेंच स्पर्धेतील त्याची मक्तेदारी कोण संपुष्टात आणणार, हे पाहणे रंजक ठरेल. मात्र नदाल, फेडरर आणि जोकोव्हिच कार्यक्रमपत्रिकेच्या एकाच भागात असल्याने त्यांच्यापैकी एकालाच अंतिम फेरी गाठता येईल, हेसुद्धा स्पष्ट झाले आहे.

नदालला फेडरर आणि जोकोव्हिच यांपासून सर्वाधिक धोका असला, तरी नव्या पिढीतील डॉमिनिक थीम, अलेक्झांडर झ्वेरेव्ह, डॅनिल मेदवेदेव आणि स्टीफानोस त्सित्सिपास या चौकडीपासून त्याला सावध राहावे लागेल. विशेषत: ऑस्ट्रियाच्या थीमने गतवर्षी अमेरिकन स्पर्धा जिंकून त्रिमूर्तीच्या वर्चस्वाला धक्का दिला. २०१८ आणि २०१९मध्ये सलग दोन वेळा फ्रेंच स्पर्धेची अंतिम फेरी गाठूनही थीमला नदालविरुद्धच पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे थीम यावेळी अधिक धोकादायक ठरू शकतो. झ्वेरेव्ह आणि मेदवेदेव यांनीसुद्धा गेल्या वर्षभरात प्रत्येकी एका ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. मात्र त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली. दुसरीकडे कारकीर्दीतील पहिल्याच ग्रँडस्लॅम स्पर्धेत फेडररला पराभवाचा धक्का देणाऱ्या त्सित्सिपासने फेब्रुवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेत नदालला चक्क पहिले दोन सेट गमावूनही धूळ चारली. त्यामुळे या चौघांकडून नदाल-फेडरर-जोकोव्हिचला कडवी झुंज मिळेल, हे निश्चित.

पुरुष एकेरीच्या तुलनेत महिला एकेरीत कोणत्याही खेळाडूला ठामपणे जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानता येणार नाही. २०१४पासूनच्या गेल्या सात वर्षांत सात विविध खेळाडूंनी ही स्पर्धा जिंकली आहे. त्यावरूनच या गटात जेतेपदासाठी किती चुरस असेल, याची जाणीव येते. रोमानियाच्या सिमोना हॅलेपने माघार घेतल्यामुळे गतविजेती पोलंडची इगा श्वीऑनटेक, जपानची नाओमी ओसाका, जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ले बार्टी या तिघींमध्ये कडवी झुंज असेल. ओसाकाने गतवर्षी अमेरिकन, तर वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे तिला ग्रँडस्लॅम हॅट्ट्रिक साकारण्याची सुवर्णसंधी आहे. ओसाकाच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा ठरू शकते, ती म्हणजे अमेरिकेची अनुभवी सेरेना विल्यम्स. ३९ वर्षीय सेरेना २०१७मध्ये अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर तिने चार स्पर्धांची अंतिम फेरी गाठली. त्यापैकी दोन वेळा ओसाकाने तिला नमवले. त्यामुळे सेरेनाला यावेळी वचपा काढण्याची संधी असेल. मार्गारेट कोर्ट यांच्या विक्रमी २४ ग्रँडस्लॅम जेतेपदांची बरोबरी साधण्यासाठी सेरेनाला केवळ एका जेतेपदाची आवश्यकता आहे.

एकंदर फ्रेंच स्पर्धेद्वारे टेनिसचा ग्रँडस्लॅम हंगाम बहरणार असून आगामी विम्बल्डन आणि अमेरिकन स्पर्धेच्या दृष्टीने लय मिळवण्यासाठी टेनिसपटू सर्वस्व पणाला लावतील, यात शंका नाही. या चढाओढीत फ्रेंच किताबाचा मानाचा तुरा कोणाच्या शिरपेचात रोवला जाणार, याचे उत्तर सर्वांना १३ जूनपर्यंत मिळेल.

भारताचे नाव  फक्त दुहेरीत!

पुरुष अथवा महिला एकेरीत भारताच्या एकाही खेळाडूला पात्रता फेरीचा अडथळा ओलांडता आला नाही. सुमित नागल, रामकुमार रामनाथन, अंकिता रैना यांना मुख्य फेरी गाठता न आल्यामुळे आता फक्त दुहेरीतच भारताचे खेळाडू खेळताना दिसतील. अनुभवी रोहन बोपण्णा आणि दिविज शरण आपापल्या विदेशी सहकाऱ्यांसह पुरुष आणि मिश्र दुहेरीत खेळणार आहेत.

rushikesh.bamne@expressindia.com