करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका भारतीय क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआय सह अन्य महत्वाच्या क्रीडा संघटनांनी आपल्या महत्वाच्या स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द केल्या आहेत. बीसीसीआयने आपल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या काळात भारतीय खेळाडूही आपल्या परिवारासोबत वेळ घालवत चाहत्यांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत. भारतीय संघाच्या मधल्या फळीतला फलंदाज श्रेयस अय्यरने या काळात एक नवीन कला जोपासली आहे.

श्रेयस घरात जादूचे प्रयोग करतो आहे. काही दिवसांपूर्वी श्रेयसने पत्त्यांच्या जादूचा एक छोटासा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला होता.

आवश्यक वाचा – करोनाचा धसका : घरात वेळ घालवण्यासाठी श्रेयस अय्यर काय करतोय पाहा…

यानंतर श्रेयसने इंटरनेटवर प्रसिद्ध असलेल्या ट्रिक्सचा वापर करत आपल्या घरातील कुत्र्यावर जादूचे प्रयोग केले आहेत. पाहा हा व्हिडीओ…

दरम्यान, २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता बीसीसीआय आयपीएल स्पर्धा रद्द करण्याची शक्यता आहे. मध्यंतरी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचं आयोजन करण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आली होती. मात्र आयसीसीचं कॅलेंडर पाहता हा पर्यायही उपलब्ध नसल्याचं बीसीसीआय अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय. मे महिन्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. याचसोबत यंदा आशिया चषकाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता असल्याचं बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं.