करोनामुळे क्रीडाविश्व ठप्प झाल्याने या क्षेत्रातील प्रशिक्षक आणि कर्मचारी वर्गाला मोठा फटका बसला आहे, असे मुख्य राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांत कोणतीच कमाई प्रशिक्षकांना करता आली नसल्याचे त्यांनी म्हटले.

क्रीडा संघटनांना मदत व्हावी म्हणून गोपीचंद यांच्यासह अर्जुन पुरस्कार विजेती धावपटू अश्विनी नचप्पा आणि अपंग धावपटू मालती होला यांनी ‘रन टू द मून’ या मोहिमेसाठी पुढाकार घेतला आहे. ‘‘करोनाकाळातील टाळेबंदीमुळे क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या तीन महिन्यांत कोणतीही कमाई या मंडळींना करता आली नाही. या नवीन मोहिमेद्वारे आम्हाला पैसे गोळा करता येतील. ती मदत क्रीडा क्षेत्राशी संबंधितांना देता येईल,’’ असे गोपीचंद यांनी सांगितले.