ला लीगा फुटबॉल स्पर्धेत सहकाऱ्यांसोबत पुन्हा खेळण्यासाठी मी तयार आहे. पण पुनरागमनानंतर करोनाचा धोका कायम असेल, असे अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेसी याने सांगितले. ‘‘करोनाचा धोका सगळीकडेच आहे. घर सोडल्यानंतर तुमच्यासोबत धोका कायम असेल. त्यामुळे त्याचा जास्त विचार करू नका. अन्यथा तुम्हाला काहीच करता येणार नाही. पण सद्यस्थितीत करोनाला दूर ठेवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणेही अत्यावश्यक आहे,’’ असे मेसीने सांगितले.

रशिया फुटबॉल लीग पुढील महिन्यापासून

करोनाचा प्रादूर्भाव वाढत असतानाही पुढील महिन्यापासून रशिया प्रीमियर फुटबॉल लीग बंद दाराआड खेळवण्यात येणार आहे. १७ मार्चपासून स्थगित करण्यात आलेली रशिया लीग २१ जूनपासून खेळवण्यात येणार आहे. या मोसमातील रशिया लीगच्या अद्याप आठ फेऱ्या शिल्लक आहेत. ‘‘दुर्दैवाने प्रेक्षकांशिवाय उर्वरित सामने खेळवण्यात येणार आहेत,’’ असे लीगचे अध्यक्ष सर्जी पायराडकिन यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीग ११ जूनपासून

ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीगला तीन महिन्यांच्या खंडानंतर ११ जूनपासून सुरुवात होणार आहे. पुढील चार फेऱ्यांचे सामने १० दिवसांत खेळवण्यात येतील, असे ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिलॉन लॅकलचलान यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीग करोनामुळे २२ मार्चपासून स्थगित करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाच्या काही भागांत विलगीकरण आणि प्रवास निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

लास्क लिंझवर कारवाईची शक्यता

ऑस्ट्रियन लीगमधील आघाडीवर असलेल्या लास्क लिंझ संघाने सराव करताना आरोग्याबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. सराव सत्राचे व्हिडीओ चित्रण पाहून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. २० एप्रिलपासून सहा जणांच्या गटाने सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र एका छुप्या कॅमेऱ्याद्वारे सहापेक्षा जास्त जणांनी सराव केल्याचे दिसत आहे.