भारतात सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सरकारी यंत्रणांमार्फत खबरदारी घेतली जात आहे. आतापर्यंत भारतात अंदाजे ६० लोकांना करोनाची लागण झालेली आहे. २९ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलवरही करोनाचं सावट आहे. काही राज्य सरकारतर्फे आयपीएलचे सामने पुढे ढकलण्याचीही मागणी करण्यात आलेली आहे. अशातच केंद्रीय क्रीडामंत्री किरेज रिजीजू यांनी आयपीएलच्या आयोजनासंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

“अत्यंत गरजेचं असेल तर आयपीएलचं आयोजन करायला हरकत नाही. प्रत्येक क्रीडा संघटनांना आम्ही आरोग्य मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या सूचना पाळायला सांगत आहोत. फक्त सामन्यांच्या ठिकाणी गर्दी करणं टाळलं पाहिजे. अत्यंत गरजेचं असल्यास योग्य ती खबरदारी घेऊन स्पर्धा खेळवता येऊ शकते. फक्त स्पर्धेच्या ठिकाणी गर्दी करुन चालणार नाही”, किरेन रिजीजू यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची भूमिका स्पष्ट केली.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व क्रीडा संघटना, बीसीसीआय या सर्वांना करोनापासून वाचण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंत परदेशी नागरिकांसाठीच्या व्हिसावर निर्बंध घातले आहेत. शनिवारी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक पार पडणार आहे, ज्यात आयपीएलच्या आयोजनाबद्दल निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आगामी काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.