सध्या देश लॉकडाउनमध्ये आहे. करोना विषाणूने सध्या जगभरात दहशत निर्माण केली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतातील लोकप्रिय IPL स्पर्धादेखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. काही खेळाडू IPL खेळवण्याच्या बाजूने आहेत, तर काहींना अशा कसोटीच्या प्रसंगी IPL खेळवलं जाऊ नये असं वाटत आहे. याचदरम्यान, भारतीय समालोचक आकाश चोप्रा यांनी IPL चे आयोजन करणं महत्त्वाचं आहे, कारण त्यावर अनेक छोटे-मोठे संसार अवलंबून आहेत, असे मत व्यक्त केलं आहे.

And it’s a SIX … युवराजने शेअर केला खास VIDEO

“करोनाच्या या साऱ्या गोंधळात सध्या क्रीडा स्पर्धा काहीशा दुर्लक्षित राहत आहेत. सध्या उद्योगधंदे, कारखाने आणि मोठे उद्योग सुरू होणं गरजेचं आहे, कारण त्यावर अनेकांचे पोट अवलंबून आहे. पण हेदेखील लक्षात घेतलंच पाहिजे की क्रीडा स्पर्धा चालू न झाल्यास माझ्यासारख्यांना फारसा फरक पडणार नाही. मी थोड्या वेळ लाइव्ह येईन आणि माझं काम होईल, पण अनेकांचे EMI अन् संसार स्पर्धांच्या आयोजनावर अवलंबून आहेत, त्याचं काय? उदाहरणादाखल IPL घ्या.. IPL मध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक लोक काम करतात. त्यांचा रोजगार त्या एका स्पर्धेवर अवलंबून असतो. अनेकांच्या घराचे आणि इतर हफ्ते त्यातून जात असतात. अशा वेळी ती स्पर्धा न झाल्याने अनेक लोकांच्या जीवनावर त्याचा विपरित परिणाम होतो. म्हणून मला वाटतं की कोणच्याही जीवाशी तडजोड न करता क्रीडा स्पर्धा खेळवण्याचा प्रयत्न करण्यात यावा, पण तो प्रयत्नदेखील अशाच क्रीडा स्पर्धांच्या बाबतीत व्हावा ज्यावर अनेकांचे संसार अवलंबून आहेत”, असे स्पष्ट मत आकाश चोप्राने टाइम्सऑफइंडियाडॉटकॉमशी बोलताना व्यक्त केलं.

 

“भारत म्हणजे मॅच फिक्सिंग माफियांचं आश्रयस्थान”; पाकिस्तानी खेळाडूचा आरोप

दरम्यान, सध्या अनेक खेळाडू बंद दाराआड आणि विनाप्रेक्षक IPL स्पर्धा आयोजित करण्याला पाठींबा देताना दिसत आहेत. सध्या सारेच घरात आहेत, अशा वेळी जर IPL स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, तर त्या स्पर्धेवर अवलंबून लोकांना रोजगार मिळेल आणि घरात बसलेल्या क्रिकेट चाहत्यांचेही मनोरंजन होईल असे मत एका क्रिकेटपटूने व्यक्त केले आहे. आम्ही आमच्या कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळात विनाप्रेक्षक सामने खेळले आहेत, त्यामुळे IPL मध्ये प्रेक्षक नसले तरी आम्ही क्रिकेट खेळू शकतो, असेही मत एका क्रिकेटपटू व्यक्त केले आहे. पण सध्या तरी खबरदारीचा उपाय म्हणून IPL चे आयोजन अनिश्चित काळासाठी लांबणीवर ढकलण्यात आले आहे.