करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा खडतर परिस्थितीत करोनाविरोधात लढण्यासाठी भारत-पाक सामने खेळून निधी उभारावा, अशी मागणी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंकडून करण्यात येत आहे.

अख्तरनंतर आणखी एका पाकिस्तानी क्रिकेटपटूला हवेत भारत-पाक सामने

सर्वप्रथम भारत-पाक सामन्याची मागणी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने केली होती. त्याच्या सुरात सूर मिसळून माजी क्रिकेटपटू आणि समालोचक रमीझ राजा यांनीही तीच मागणी केली. त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे. माजी पाकिस्तानी स्फोटक फलंदाज शाहिद आफ्रिदी यानेही अशीच मागणी केली असून याबाबत बोलताना आफ्रिदीने मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.

रामायण आणि विरेंद्र सेहवाग… हे आहे ‘स्पेशल’ कनेक्शन

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने तोपर्यंत होणे शक्य नाहीत, जोपर्यंत मोदी सरकार सत्तेत आहे, असे मत आधी आफ्रिदीने व्यक्त केले होते. त्यात आता त्याने आणखी गरळ ओकली आहे. “आम्ही (पाकिस्तान) भारताशी क्रिकेट खेळायला तयार आहोत, पण मोदी सरकार असेपर्यंत तरी हे शक्य नाही. कारण मोदी सरकार म्हणजे नकारात्मकता! मोदी सरकारच्या कार्यपद्धतीतून नकारात्मक भावना दिसून येते. पाकिस्तान भारताशी क्रिकेट खेळण्याबाबत कायम सकारात्मक आहे, पण भारतानेही थोडी सकारात्मकता दाखवायला हवी”, असे आफ्रिदीने म्हटले आहे.

“…तर मी संघाबाहेर केवळ पाणी देत राहिलो असतो”

याआधी, “क्रिकेटबद्दल भारत आणि पाकिस्तान यांच्यात इतका तणाव का असतो माहिती नाही. क्रिकेटच्या माध्यमातून आपण एकमेकांना चांगल्या पद्धतीने जाणून घेऊ शकतो. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने खेळले जायला हवेत. किमान त्या दृष्टीने आता प्रयत्न तरी करायला हवेत. चाहत्यांनीच आता भारत-पाक सामने तटस्थ ठिकाणी खेळवायचा आग्रह धरायला हवा”, असे मत माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू रमीझ राजा यांनी व्यक्त केले आहे.