सध्या करोनाचं संकट सर्वत्र आहे. करोना तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखभर लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. तशातच पंतप्रधान मोदी यांनी बुधवारपासून देशभरात लॉकडाउन जाहीर केला, त्यामुळे मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्यासाठी लोकांना घरातच रहावे लागले.

लॉकडाउनमुळे मराठी नागरिकांनी एकमेकांना सोशल मीडियावरून आणि फोनवरून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या अन् संदेश दिला. “आज गुढी पाडवा, मराठी नववर्षाचा पहिला दिवस. नेहमी आपण हा सण मोठ्या उत्साहाने करतो मात्र आज परिस्थिती गंभीर आहे. करोनाशी लढण्यासाठी आपण आपापल्या घरी राहण्याच्या दृढ संकल्पाची गुढी उभारुयात. लवकरात लवकर हे संकट संपेल अशी प्रार्थना करूया. गुढी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”, असा मोलाचा संदेश देत त्याने साऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, करोनाचं संकट उद्भवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा देशाला संबोधित करत मंगळवारी मोठी घोषणा केली. जनता कर्फ्यूनं दाखवून दिलं की देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्या राष्ट्रांकडं अत्याधुनिक साधनं असूनही हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की तयारीच करता येत नाही. त्यामुळे मंगळवार रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. त्याला विराट कोहलीसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी समर्थन दिले.