करोना विषाणूचा फटका बांगलादेशमधील World XI vs Asia XI सामन्यांनाही बसला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही सामने पुढे ढकलले आहेत. बांगलादेशच्या निर्मितीसाठी मोलाचं योगदान देणाऱ्या शेख मुजीबउर रेहमान यांच्या जन्मशताब्दीनिमीत्त बांगलादेश क्रिकेट बोर्डाने World XI vs Asia XI टी-२० सामन्यांचं आयोजन केलं होतं. आयसीसीने या सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जाही दिला होता.

२१ आणि २२ मार्चरोजी हे सामने ढाका येखील मैदानात खेळवले जाणार होते. मात्र जगभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे झालेली परिस्थिती लक्षात घेता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने हे दोन्ही सामने पुढे ढकलले आहेत. “स्पर्धेत सहभागी होणारे परदेशी खेळाडू या सामन्यांसाठी येऊ शकतील याची खात्री नव्हती. त्यातच सध्या करोनामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध आलेले आहेत. त्यामुळे महिनाभराच्या कालावधीनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन तारीख जाहीर करण्यात येईल.” बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी ESPNCricinfo संकेतस्थळाशी बोलताना माहिती दिली.