चित्तथरारक लढतीत ‘सुपर-ओव्हर’मध्येही अंतिम सामना टाय अवस्थेत सुटल्यानंतर न्यूझीलंडला विश्वचषकावर पाणी सोडावे लागले. मुळात अंतिम सामन्यात न हरताच विश्वचषक गमावल्याची गोष्ट  पचवणे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनसाठी जड जात आहे. मात्र ‘सभ्य माणसांच्या खेळा’तील सभ्य कर्णधार असा नावलौकिक मिळवणाऱ्या विल्यम्सनने मात्र या निर्णयावर कुठेही राग व्यक्त केला नाही. उलट चौकार मोजून विजेता ठरवण्याचा नियम योग्य आहे का, असा सवाल त्याने विचारला आहे.

‘‘या नियमाबाबत कुणीही मला कधीही प्रश्न विचारला तरीही त्याचे उत्तर मी देऊ शकणार नाही. आमच्या भावना शब्दांत मांडणे कठीण आहे. पण दोन्ही संघ दमदार कामगिरी करत असताना दोन वेळा त्यांच्यातील विजेता ठरू शकत नव्हता. मग या नियमामुळे एका संघाच्या चेहऱ्यावर हसू उमटले तर दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू अवतरले. अनेकांनी हा नियम हास्यास्पद असल्याचे म्हटले तरी खरा खिलाडूवृत्ती असल्यामुळे आयसीसीच्या या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा माझा हेतू नाही,’’ असे विल्यम्सनने सांगितले.

‘‘स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच हे नियम अस्तित्वात होते. अशाप्रकारचा निकाल लागेल, अशी कुणी कल्पनाही केली नसेल. एका उत्कंठावर्धक सामन्याचा निखळ आनंद चाहत्यांनी लुटला असेल. आम्ही या नियमाला दोष देत नाही. मात्र विश्वचषक गमावल्याचे दु:ख होत आहे. संघातील खेळाडूंनी जिंकण्यासाठी अथक मेहनत घेतली, पण काही गोष्टी रोखणे (मार्टिन गप्तिलचा ओव्हरथ्रो) आमच्या हातात नव्हते,’’ असेही त्याने सांगितले.

स्टोक्स प्रेरणादायी – मॉर्गन

इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील सामनावीर बेन स्टोक्सवर स्तुतिसुमने उधळली. तो म्हणाला, ‘‘संपूर्ण सामन्यादरम्यान बेन स्टोक्सने ज्याप्रकारे संयम बाळगून खेळ केला, ते कौतुकास्पद होते. दडपणाच्या परिस्थिीततही त्याने अखेपर्यंत न्यूझीलंडला झुंज दिली. त्यामुळे घरी बसून सामना पाहणाऱ्या सर्वानी पुढील स्टोक्स होण्याचा निश्चय करा. त्याने कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारून इंग्लंडला विश्वविजेता बनवले. चाहत्यांच्या पाठिंब्याशिवाय आणि खेळाडूंच्या अथक मेहनतीशिवाय हे शक्य झाले नसते. त्यामुळे आजचा दिवस माझ्या कायम स्मरणात राहिल.’’

स्टोक्सने मनोबल उंचावले -आर्चर

सुपर ओव्हरमध्ये जेम्स नीशामने षटकार लगावल्यानंतर मी खचलो होतो, परंतु सर्वप्रथम बेन स्टोक्सने जवळ येऊन माझे मनोबल उंचावल्यामुळे मी उर्वरित षटकात चांगली कामगिरी करू शकलो, अशी प्रतिक्रिया वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने व्यक्त केली. ‘‘सुपरओव्हर टाकण्यापूर्वी मी स्वत: मॉर्गनकडे जाऊन त्याला नक्की मलाच गोलंदाजी द्यायची आहे की नाही, याची खात्री करून घेतली. नीशामने षटकार मारल्यावर स्टोक्सने माझ्याशी संवाद साधला.हे षटक सर्वाचीच कारकीर्द घडवू शकते. मात्र निकाल आपल्या बाजूने लागला, तर चाहते तुला सदैव स्मरणात ठेवतील. स्टोक्सच्या याच शब्दांनी मला प्रेरित केले,’’ असे आर्चरने सांगितले.

विजयाचे श्रेय आम्हालाच -प्लंकेट

चाहत्यांच्या अपेक्षेनुसार खेळ केल्यामुळे आम्हालाच या विश्वचषकाचे खरे श्रेय जाते, असे वेगवान गोलंदाज लिआम प्लंकेट म्हणाला. ‘‘खरे सांगायचे तर मी भविष्यवाणी वगैरे अशा गोष्टी मानत नाही. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी अनेकांनी आम्हाला विश्वविजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले होते आणि चाहत्यांच्या या अपेक्षांची पूर्तता केल्यामुळे फार अभिमान वाटत आहे. गेल्या चार वर्षांत आम्ही इंग्लंड संघाचे स्थित्यंतर घडवून आणले आहे. मायदेशाबाहेरील खेळपट्टय़ांवरही आम्ही विजय मिळवले. मात्र अंतिम फेरीत न्यूझीलंडने दिलेल्या कडव्या झुंजीला सलाम. त्यांच्या प्रतिकारामुळेच हा सामना इतका रंगतदार झाला,’’ असे प्लंकेटने सांगितले.

विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा निकाल ‘सुपर-ओव्हर’द्वारे लावणे हा भयंकर मार्ग म्हणावा लागेल. सद्यपरिस्थितीत इऑन मॉर्गन आणि केन विल्यम्सन या दोघांच्याही हातात विश्वचषक शोभून दिसला असता. सुपर-ओव्हरद्वारे विजेता ठरवणे हे म्हणजे हास्यास्पद आहे. सुपर-ओव्हरचा थरार हा बाद फेरीपुरता योग्य ठरला असता. पण अंतिम सामन्यासाठी नव्हे.

– माइक हेसन, न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक