मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसाआय) अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठीचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्याने अर्ज दाखल केल्यास अध्यक्ष पदी निवड होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

४६ वर्षीय सौरव गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर आहे. त्याबरोबरच त्याच्याकडे बीसीसीआयच्या तांत्रिक समिती, क्रिकेट सल्लागार समिती आणि आयपीएल शासकीय समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश आहे. गांगुली गेल्या चार वर्षांपासून भारतीय क्रिकेट वर्तुळामध्ये प्रशासक म्हणून काम करत आहे. त्यामुळे गांगुलीने जर अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केल्यास पहिली पसंती त्याला मिळू शकते.

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या नव्या संविधानाला मान्यता दिल्यानंतर, आता अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीसीसीआयच्या नव्या संविधानानुसार ‘कूलिंग ऑफ पीरियड’ नियमांतर्गत अनेक विद्यमान आणि माजी प्रशासक बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करू शकत नाही. त्यामुळेच या पदासाठी सध्या गांगुलीच्या नावाची चर्चा आहे.