नवी दिल्ली : २०२०मध्ये टोकियोला होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेच्या अभियानाला प्रारंभ झाला आहे. खरा प्रवास आता सुरू झाला आहे, असे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सांगितले.

आशियाई क्रीडा स्पध्रेतील पदकविजेत्या खेळाडूंना मंगळवारी केंद्र सरकारकडून रोख रकमेची बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. वैयक्तिक प्रकारातील सुवर्णपदक विजेत्याला ४० लाख, रौप्यपदक विजेत्याला २० लाख आणि कांस्यपदक विजेत्याला १० लाख रुपयाचे इनाम देण्यात आले.

‘‘तुमच्या योगदानाबद्दल सर्व देशवासियांना अभिमान वाटतो आहे. तुमच्या कामगिरीचे सर्वानाच कौतुक आहे. परंतु हा प्रवास अद्याप संपलेला नाही,’’ असे राठोड यांनी सांगितले.

भारताने आशियाई स्पध्रेत १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३० कांस्य अशी एकूण ६९ पदकांची कमाई केली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, महेश शर्मा, क्रीडा सचिव राहुल भटनागर, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक नीलम कुमार उपस्थित होते.