९ मार्चपासून सौराष्ट्र विरुद्ध बंगाल या संघांमध्ये रणजी क्रिकेट सामन्याची अंतिम फेरी खेळवली जाणार आहे. सौराष्ट्र आणि बंगाल हे दोन्ही संघ प्रदीर्घ कालावधीनंतर रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचले आहेत…त्यामुळे दोन्ही संघ विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. न्यूझीलंड दौऱ्यात संधी न मिळालेला यष्टीरक्षक वृद्धीमान साहा अंतिम फेरीत बंगालकडून खेळणार आहे. तर चेतेश्वर पुजाराही सौराष्ट्राच्या संघाकडून मैदानात उतरेल. भारतीय संघातल्या आणखी एका अष्टपैलू खेळाडूला रणजीच्या अंतिम फेरीत खेळवण्यासाठी सौराष्ट्र क्रिकेट बोर्ड प्रयत्नशील होतं, मात्र बीसीसीआयने त्यांची ही विनंती नाकारली आहे. रविंद्र जाडेजा हा स्थानिक स्पर्धेत सौराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करतो, जाडेजाला अंतिम फेरीत खेळण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शहा यांनी केली होती. मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या मागणीला नकार दर्शवला आहे.

“रविंद्र जाडेजाला रणजी अंतिम फेरीत खेळण्याची परवानगी देता येणार नाही, देशाकडून खेळणं महत्वाचं आहे.” जयदेव शहा यांनी सौरव गांगुलीची बाजू प्रसारमाध्यमांना सांगितली. यावेळी जयदेव शहा यांनी रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय सामन्याचं आयोजन केलं जाऊ नये अशी मागणी केली. ९ तारखेपासून रणजी स्पर्धेचा अंतिम सामना सुरु होणार असून, १२ तारखेपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात ३ वन-डे सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. “जर रणजी क्रिकेट स्पर्धेकडे प्रेक्षकांनी अधिकाधीक प्रमाणात यावं असं बीसीसीआयला वाटत असेल तर यादरम्यान आंतरराष्ट्रीय सामन्याचं आयोजन केलं जाऊ नये. आयपीएलदरम्यान बोर्ड असं काही करेल का?? नाही कारण आयपीएलमधून पैसा मिळतो. जर भारतीय संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना अंतिम फेरीत खेळण्याची संधी दिली तरच रणजी स्पर्धेकडे लोकं पुन्हा वळतील.” जयदेव शहा यांनी आपली बाजू मांडली.