सध्या इंग्लंडमध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. स्पर्धेत गोलंदाज आणि फलंदाज दोघेही आपली विशिष्ट शैली दाखवून छाप सोडत आहेत. याच बरोबर इंग्लंडमध्ये सुरु असलेली काऊंटी क्रिकेट स्पर्धाही चांगलीच चर्चा आहे. नुकताच या स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरने वेगवान गोलंदाजी करत फलंदाजांचा त्रिफळा उडवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यातच आता आणखी एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. फिरकी गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर २ खेळाडूंच्या संयुक्त प्रयत्नाने घेतलेला हा झेल चांगलाच चर्चेत आहे.

फिरकी गोलंदाजाने चेंडू टाकला. फलंदाजाला तो चेंडू समजू शकला नाही. त्यामुळे त्याच्या बॅटची कड चेंडूला लागली आणि चेंडू थेट यष्टिरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये गेला. पण यष्टिरक्षकाच्या हातून चेंडू निसटला. तरीदेखील अत्यंत चपळाईने आणि चतुरपणे यष्टिरक्षकाने चेंडू जमिनीवर पडण्यापूर्वीच त्याला लाथ मारली आणि सिली पॉईंटला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने तो झेल टिपला. त्यानंतर पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केले. या अजब झेलामुळे काही काळ फलंदाजही अवाक झाला होता.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, या आधी अर्जुन तेंडुलकर याचाही एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत त्याने स्विंग गोलंदाजी करत फलंदाजांचा त्रिफळा उडवला होता. या व्हिडिओवर खूप सकारात्मक कमेंटही पाहायला मिळाल्या होत्या.