धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीविरुद्ध जारी करण्यात आलेले अजामीनपात्र वॉरंट आंध्र प्रदेशातील स्थानिक न्यायालयाने मागे घेतले. बिझनेझ टुडे नावाच्या साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर विष्णूच्या अवतारात धोनीचे छायाचित्र छापण्यात आले होते. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धोनीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने वॉरंट मागे घेतल्याचे धोनीच्या जाहिरीतींचे व्यवस्थापन करणाऱ्या ऱ्हिती कंपनीने स्पष्ट केले. रजनीश चोप्रा यांच्या नेतृत्त्वाखालील विधी समितीने धोनीविरुद्धचे वॉरंट मागे घेण्याची विनंती केली होती.
न्यायालयाने धोनीला समन्स बजावला नव्हता आणि प्रत्यक्ष हजर राहण्याचा आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले नव्हते. त्यामुळे धोनीच्या वतीने प्रतिनिधी उपस्थित होते. चोप्रा यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य़ मानून, न्यायालयाने धोनीविरुद्धचे वॉरंट मागे घेतले. याप्रकरणी पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला होणार आहे.