News Flash

व्याप्ती वाढली, गुणवत्तेचे काय?

मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा (एमडीएफए) पसारा १९८३ साली स्थापन झाल्यानंतर वर्षांगणिक वाढत गेला. केवळ ५७ क्लब संलग्न असलेल्या असोसिएशनशी आजमितीला ३५०हून अधिक क्लब संलग्न आहेत.

| August 1, 2015 03:39 am

मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा (एमडीएफए) पसारा १९८३ साली स्थापन झाल्यानंतर वर्षांगणिक वाढत गेला. केवळ ५७ क्लब संलग्न असलेल्या असोसिएशनशी आजमितीला ३५०हून अधिक क्लब संलग्न आहेत. परंतु केवळ व्याप्ती वाढून मुंबईतील फुटबॉलचा विकास होईल, असा एमडीएफचा असलेला गैरसमज दूर होण्याची नितांत आवश्यकता आहे. क्लबची संख्या वाढल्यामुळे निवडणुकीसाठी राजकारण मात्र वाढले आणि त्यामुळे आपली खुर्ची टिकवण्यासाठी मत जपण्याची लाचारीही वाढली.
महाराष्ट्रातील जिल्ह्य़ांमध्ये मुंबईत फुटबॉलचा विस्तार अधिक आहे. ३५० क्लब संलग्न असलेल्या या असोसिएशनचा प्रगतीचा आलेख मात्र संथ गतीने सुरू आहे. अपुरे मैदान, मूलभूत सुविधांचा अभाव, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, केवळ सत्तेसाठी उत्सुक पदाधिकारी, आदी समस्यांमुळे मुंबईत फुटबॉलचा विकास हवा तसा होत नसल्याची खंत काही माजी खेळाडूंनी बोलून दाखवली आहे. अनेकदा एखाद्या क्लबने संघ उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत न खेळण्याचा निर्णय कळवल्यामुळे एमडीएफएवर सामने पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवलेली आहे. अशा संघांवर कारवाई न करता, केवळ मतांसाठी त्यांच्या असभ्य वर्तवणुकीकडे दुर्लक्ष करण्याचे काम पदाधिकारी करत असल्याचा आरोपही असोसिएशनच्या सदस्यांकडून करण्यात येत आहे.
नव्या सत्राची सुरुवात होताना प्रत्येक क्लबना वर्षांचे वेळापत्रक दिले जाते आणि त्यांची मते जाणून घेतल्यानंतरच अंतिम वेळापत्रक बनवले जाते. असे असतानाही काही क्लब विविध कारणे देत ऐन सामन्याच्या दिवशी न खेळण्याचा पवित्रा घेत असल्याने असोसिएशनच्या नाचक्की होते. तरीही त्यावर कारवाई होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. अशा क्लबवर कारवाई केल्यास असे प्रकार घडणार नाही, इतकी सोपी गोष्ट असोसिएशनच्या ध्यानात न येणे, हे समजण्यापलीकडचे आहे. क्लबसंख्या वाढल्याचा दावा करत असलेले असोसिएशनचे पदाधिकारी मूलभूत सुविधांबाबत बोलताना मात्र सोयीची भूमिका घेताना दिसतात. क्लब वाढले म्हणजे मते वाढली आणि त्यामुळेच कोणीही ठोस कारवाई करण्याचे धाडस करत नाही, अशी माहिती वरिष्ठ खेळाडूंनी दिली. असोसिएशनकडून मात्र या आरोपांचे खंडन होत आहे. अशा क्लबवर कारवाई केल्याचा दावा त्यांच्याकडून होत असला तरी आतापर्यंत अशा कारवाई किती वेळा केल्या याचे उत्तर त्यांच्याकडे नाही.

संघ उपलब्ध नसल्याने सांगून अनेकदा क्लब सामना खेळण्यास नकार देतात आणि त्या दिवशीची लढत रद्द करावी लागते. परंतु, अशा क्लबवर कारवाई करत नसल्याचा आरोप चुकीचा आहे. आम्ही त्यांना ताकीद देतो आणि त्यानंतरही त्यांच्याकडून असे प्रकार घडल्यास त्यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात येते.
– उदयन बॅनर्जी, एमडीएफएचे सचिव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2015 3:39 am

Web Title: coverage increased what about quality
टॅग : Quality
Next Stories
1 वारंवार प्रशिक्षक बदलांमुळे भारतीय हॉकीचा ऱ्हास –वॉल्श
2 बंगळुरूचा सफाईदार विजय
3 फिफा अध्यक्षपदासाठी झिको यांना ब्राझीलचा पाठिंबा
Just Now!
X