News Flash

करोनाविरुद्धच्या लढ्याला ५० हजार डॉलर्सचं पाठबळ; भारताच्या मदतीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा पुढाकार

ऑस्ट्रेलियातील इतर नागरिकांनाही भारताला मदत करण्याचं केलं आवाहन

मूळ फोटो (सौजन्य : पीटीआय)

ऑस्ट्रेलियन क्रिकेट नियामक मंडळाने भारताला करोना संकटाच्या काळामध्ये मदत करण्यासाठी हात पुढे केलाय. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन आणि युनिसेफ ऑस्ट्रेलियाने एकत्र येऊन भारतासाठी ५० हजार अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली होती. भारतामधील सध्याची करोना परिस्थिती चिंताजनक असून सध्या भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सुरु असणाऱ्या घडामोडींमुळे आम्हाला खूप दु:ख होत आहे. भारतासोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध असणारा ऑस्ट्रेलिया या संकटकाळात भारतासोबत आहे असं या संस्थांनी स्पष्ट केलं आहे.

युनिसेफ ऑस्ट्रेलियाने भारतामधील ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात काम करताना ऑक्सिजन निर्माण करणारी यंत्रणा भारतीय रुग्णालयांमध्ये उभारण्यासाठी सहकार्य करणार असल्याचं सांगितलं आहे. करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यांमधील चाचण्या वाढवण्यासाठी चाचण्यासंदर्भातील साहित्य तसेच लसीकरणासाठी आवश्यक असणारं साहित्य युनिसेफ ऑस्ट्रेलियाकडून पुरवलं जाणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ५० हजार अमेरिकन डॉलर्सचा (जवळजवळ ३७ लाख रुपये) निधी दिला असून ऑस्ट्रेलियन नागरिकांनाही त्यांनी संकटाच्या काळामध्ये भारताला मदत करण्यासाठी पुढाकार घेत जमेल ती रक्कम मदत म्हणून देण्याचं आवाहन केलं आहे. ही मदत देण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक लिंकही उपलब्ध करुन दिलीय.

“भारतीय आणि ऑस्ट्रेलियन लोकांमध्ये विशेष मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोन्ही देशातील लोकांना क्रिकेटबद्दल असणारं प्रेम या आपल्या मैत्रीच्या केंद्रस्थानी आहे. भारतातील आमच्या अनेक बंधू भगिनींना करोनाचा संकटाचा सामना करताना येणाऱ्या अडचणींबद्दल ऐकून खूपच दु:ख होत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसलेल्या सर्वांसोबत आमच्या सदिच्छा आहेत,” असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हंगामी कार्यकारी अधिकारी असणाऱ्या निक हॉकले यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पॅट कमिन्सने करोना कालावधीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ३७ लाखांची मदत केलीय. कमिन्सनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीनेही भारतीयांसाठी मदतीचा हात पुढे केला. लीने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सुमारे ४२ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. कमिन्सने या कठीण काळात भारताला मदत करण्याची विनंती त्याच्या सहकाऱ्यांना केली होती. या आवाहनानंतर लीने भारताला मदत केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 10:17 am

Web Title: covid 19 cricket australia donates 50000 usd to help india fight pandemic scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नेतृत्वबदलानंतरही हैदराबाद अपयशी
2 कोलकातापुढे बेंगळूरुचे पारडे जड
3 राहुलची शस्त्रक्रियेमुळे माघार; अगरवालकडे नेतृत्व
Just Now!
X