सहावेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी महिला बॉक्सर मेरी कोमही करोनाविरुद्ध लढ्यात मैदानात उतरली आहे. राज्यसभा खासदार असलेल्या मेरी कोमने आपला एका महिन्याचा पगार पंतप्रधान सहायता निधीला देण्याचं जाहीर केलं आहे.

सध्या देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, मला एका महिन्याचा पगार पंतप्रधान सहायता निधीला द्यायचा आहे. माझ्या खात्यातून १ लाख रुपये पंतप्रधान सहायता निधीला देण्यात यावे, असं पत्र मेरी कोमने आपल्या बँकेच्या अधिकाऱ्यांना लिहीलं आहे. २०१६ साली मेरी कोमची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. मेरीने राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांचं विजेतेपद पटकावलं होतं. आपल्या पगाराव्यतिरीक्त मेरी कोमने आपल्या खासदार निधीतून एक कोटींचा निधी मदतकार्याला द्यायचं ठरवलं आहे.