देशभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका भारतातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआय आणि इतर महत्वाच्या क्रीडा संघटनांनी आपल्या सर्व स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द केल्या आहेत. अनेक क्रीडा संघटना या काळात पंतप्रधान सहायता निधीला मदत करत आहेत. खडतर काळात देशात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना कोणतीही कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक व्यक्ती दान करत आहे. हॉकी इंडियानेही करोनाविरुद्ध लढ्यात पंतप्रधान सहायता निधीला २५ लाखांची रक्कम देण्याचं जाहीर केलं आहे.

“सध्याच्या खडतर काळात प्रत्येकाने पुढे येऊन आपल्याला ज्या पद्धतीने जमेल तशी मदत करणं अपेक्षित आहे. हॉकी इंडियाच्या संचालक मंडळाने एकमताने पंतप्रधान सहायता निधीला २५ लाखांची रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाने आतापर्यंत हॉकीला आणि हॉकीपटूंना उदंड प्रेम दिलं आहे. त्यामुळे देशासाठी आणि नागरिकांसाठी जे काही करता येणं शक्य आहे ते आम्ही करत आहोत, अशा शब्दात हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी आपल्या भावना मांडल्या.

देशभरात करोना वादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, देशभरात २१ दिवसांचं लॉकडाऊन घोषित करण्यात आलेलं आहे. दररोज देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे या प्रयत्नांना आता कधीपर्यंत यश मिळतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.