कॅरेबियन प्रमिअर लिग स्पर्धेत सध्या प्रत्येक सामन्यात नव-नवीन विक्रम होत आहेत. या स्पर्धेत नुकतीच सर्वांची चिंता वाढवणारी एक घटना घडली. जमैका थलावाज विरुद्ध सेंट ल्युसिया सामन्यात, अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलच्या डोक्यावर चेंडू आदळल्यामुळे त्याला मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. कॅरेबियन प्रमिअर लिग स्पर्धेत रसेल जमैका संघाकडून खेळतो आहे.

सेंट ल्युसिया संघाचा जलदगती गोलंदाज हार्डस विलजोन सामन्यातलं १४ वं षटक टाकत होता. या षटकात विलजोनच्या बाऊंसर चेंडू रसेलच्या कानाजवळ जाऊल आदळला. या चेंडूचा फटका इतका जोरात होता की रसेल जागच्या जागी मैदानात कोसळला. यानंतर संघाच्या वैद्यकीय पथकाने त्याच्यावर प्रथमोपचार करत त्याला स्ट्रेचवरुन मैदानाबाहेर नेत थेट हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना जमैका संघाने १७० धावांपर्यंत मजल मारली. जमैका संघाकडून ग्लेन फिलिप्स, रोव्हमन पॉवेल यांनी उपयुक्त खेळी करत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. सेंट ल्युसियाकडून ओबे मॅकॉय-फवाद अहमद यांनी प्रत्येकी २-२ तर थिसारा पेरेराने एक विकेट घेतली.

सेटं ल्युसिया संघाने १६.४ षटकांत ५ फलंदाजांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. आंद्रे फ्लेचर (नाबाद ४७) आणि रहकिम कोर्नवॉल (७५) यांनी फटकेबाजी करत संघाचा विजय सुकर केला.