कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कॅरेबिअन प्रमिअर लिग स्पर्धेत त्रिंबागो नाईट रायडर्स संघाने CPL चं विजेतेपद मिळवलं आहे. अंतिम सामन्यात नाईट रायडर्सने सेंट लुशिया झौक्सवर ८ गडी राखून मात केली. महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेत नाईट रायडर्सचा संघ अजिंक्य राहिला आहे. साखळी फेरीतल्या पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत सर्व सामने नाईट रायडर्सने जिंकले आहेत. विजयासाठी मिळालेलं १५५ धावांचं आव्हान नाईट रायडर्सने लेंडल सिमन्सच्या नाबाद ८४ धावांच्या खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. सिमन्सला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

त्रिंबागो नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फटकेबाजी करणाऱ्या रखीम कॉर्नवॉलला अली खानने त्रिफळाचीत करत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर सेंट लुशियाच्या आघाडीच्या फळीतल्या इतर फलंदाजांनी चांगली खेळी करत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. आंद्रे फ्लेचरने ३९ धावा काढत याच महत्वाची भूमिका बजावली. परंतू मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली आणि सेंट लुशियाचा डाव गडगडला. नाईट रायडर्सकडून कर्णधार पोलार्डने ४, फवाद अहमद आणि अली खानने प्रत्येकी २-२ तर अकील हुसेनने १ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल नाईट रायडर्स संघाची सुरुवातही खराबच झाली होती. आघाडीच्या फळीतले दोन फलंदाज अवघ्या १९ धावांत माघारी परतले. मात्र यानंतर लेंडल सिमन्स आणि ड्वेन ब्राव्हो या फलंदाजांनी सेंट लुशियाच्या गोलंदाजांची धुलाई करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सिमन्सने ४९ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८४ धावा केल्या. त्याला ब्राव्होने ४७ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ५८ धावा काढत चांगली साथ दिली. नाईट रायडर्सचा कर्णधार पोलार्डला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.