20 September 2020

News Flash

CPL 2020 : बॉल शोधण्यासाठी खेळाडूंची शोधमोहीम, प्रेक्षकांविना क्रिकेट सामन्यांचा असाही तोटा

अंतिम सामन्यात घडला प्रकार

करोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या क्रिकेट सामन्यांमध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात येत नाहीये. परंतू प्रेक्षकांविना क्रिकेट खेळण्याचा मोठा फटका सामन्यादरम्यान पहायला मिळतोय. फलंदाजांनी मारलेला षटकार प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये जाऊन पडला की चेंडू शोधण्यासाठी क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघातील खेळाडूंना आपला वेळ खर्च करावा लागतोय. एरवी मैदानात उपस्थित प्रेक्षक हा चेंडू लगेच परत करत असतात. कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेचा अंतिम सामना अशाच बॉल शोधमोहीमेसाठी काहीकाळ थांबवावा लागला.

सेंट लुशियाने विजयासाठी १५५ धावांचं आव्हान त्रिंबागो नाईट रायडर्सला दिलं होतं. यादरम्यान डॅरेन ब्राव्होने रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार थेट प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये गेला. मात्र हा बॉल शोधण्यासाठी सेंट लुशियाच्या खेळाडूंना चांगलीच धावपळ करावी लागली. बॉल शोधेपर्यंत मग काही खेळाडूंनी मैदानातच बसून वाट पाहणं पसंत केलं. किमान ५ मिनीटं बॉलची शोधमोहीम सुरु होती. यानंतर अखेरीस बॉल सापडला आणि सामन्याला सुरुवात झाली.

दरम्यान धावसंख्येचा पाठलाग करताना नाईट रायडर्स संघाची सुरुवातही खराबच झाली होती. आघाडीच्या फळीतले दोन फलंदाज अवघ्या १९ धावांत माघारी परतले. मात्र यानंतर लेंडल सिमन्स आणि ड्वेन ब्राव्हो या फलंदाजांनी सेंट लुशियाच्या गोलंदाजांची धुलाई करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सिमन्सने ४९ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८४ धावा केल्या. त्याला ब्राव्होने ४७ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ५८ धावा काढत चांगली साथ दिली. नाईट रायडर्सचा कर्णधार पोलार्डला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 11:29 am

Web Title: cpl final comes to a halt as fielders search for cricket ball in distant stands psd 91
Next Stories
1 CPL 2020 : त्रिंबागो नाईट रायडर्सला विजेतेपद, ८ गडी राखून जिंकला सामना
2 दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डावर सरकारी कारवाई, कारभाराची चौकशी होणार
3 अमेरिकन टेनिस स्पर्धा : सेरेना, थिम उपांत्य फेरीत
Just Now!
X