सुप्रिया दाबके

करोना साथीच्या काळात जैव-सुरक्षित वातावरणामध्ये परदेशात अनेक क्रीडा स्पर्धा, सराव शिबिरे सुरू आहेत. त्याच धर्तीवर देशभरात लागू असलेल्या टाळेबंदीशी  संघर्ष करीत अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक रवी रासकट आणि आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गवते या गुरू-शिष्याने  परभणीपासून २० किलोमीटर अंतरावरील पिंपळ गावात जैव-सुरक्षित वातावरणाची निर्मिती केली आहे. दोन महिने २५ खेळाडू तिथे निवासी सराव करीत आहेत.

करोना काळात राज्यात लागू असलेल्या बंधनांमुळे खेळाडूंना योग्य सराव करता येत नाही. परंतु रासकट आणि ज्योती या द्वयीने हार मानली नाही. ज्योतीला काही वर्षांपूर्वी इनाम म्हणून परभणीमध्ये भूखंड मिळाला होता. पिंपळ गावातील त्याच भूखंडावर हा २५ खेळाडूंचा सराव सुरू आहे. या खेळाडूंची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था याकडेही हे दोघे गांभीर्याने पाहतात. ‘‘दररोज जेवणात अंडी मिळतील याची हमी नाही. मात्र दूध आणि मिळणारे पोळी-भातासारखे जेवण या जोरावर हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून आहेत,’’ असे रासकट यांनी सांगितले. शालेय-महाविद्यालयीन खेळाडू सरावासह ऑनलाइन तासिकांनाही येथूनच हजेरी लावतात.

‘‘जैव-सुरक्षित वातावरण हा करोना काळातील विशेष शब्द झाला. मात्र करोना संसर्गापासून खेळाडू दूर राहावेत आणि त्यांच्या सरावावरही परिणाम होऊ नये यासाठी ही जागा ठरवण्यात आली आहे. परभणी शहराच्या विद्यापीठातील मैदानावर आमचा नेहमी सराव होत असे. मात्र सध्या तिथे सराव करणे अवघड होते. त्यातच खेळाडूंचा सराव करोनाची साथ सुरू झाल्यावर बंद झाला होता. त्यावर मार्ग शोधणे परभणीत लहानशा खेडेगावांमधून राहणाऱ्या जिद्दी खेळाडूंसाठी आवश्यक होते. ते हेरुनच स्वतंत्र जागा सरावासाठी ठरवावी हे सुचले,’’ असे रासकट यांनी सांगितले.

‘‘सध्या खेळाडूंचा खर्च ज्योतीच्या बक्षिस रकमेतून सुरू आहे. खेळाडू त्यांना शक्य होईल तशी आर्थिक मदत करतील अशी अपेक्षा आहे. तसेच अ‍ॅथलेटिक्स संघटनेकडूनही आम्हाला या कार्यात मदतीची अपेक्षा आहे,’’ असे रासकट यांनी सांगितले. ज्योतीप्रमाणेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील धावपटू किरण मात्रे हादेखील रासकट यांचा शिष्य येथे सराव करीत आहे.